Railway News 
जळगाव

Railway Rules| रेल्वे प्रवाशांनो सावधान! आरक्षणासोबत 'ओळखपत्र' अनिवार्य; नाहीतर होणार मोठी कारवाई

सवलत आणि आरक्षणाचा गैरवापर रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाची कडक पावले

पुढारी वृत्तसेवा

जळगाव: रेल्वे प्रवासादरम्यान ‘तिकीट आहे ना, मग ओळखपत्राची काय गरज?’ अशा थाटात फिरणाऱ्या प्रवाशांना आता मध्य रेल्वे चांगलाच दणका देणार आहे. सवलती, आरक्षण आणि पासचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनातर्फे १ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण विभागात महिनाभर विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत एका तिकिटावरील एकाही प्रवाशाकडे मूळ ओळखपत्र नसल्यास त्या पीएनआरवरील सर्व प्रवाशांना ‘विनातिकीट’ घोषित करून जबर दंड ठोठावला जाणार आहे.

रेल्वे प्रशासनाच्या महसुलात होणारी गळती रोखणे आणि आरक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांना चाप लावणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. जळगाव, भुसावळसह मध्य रेल्वेच्या सर्व प्रमुख स्थानकांवर आणि धावत्या गाड्यांमध्ये तिकीट तपासणी पथके तैनात केली जाणार आहेत. सवलतीच्या दरातील तिकिटे, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण अथवा दिव्यांगांचा विशिष्ट आरक्षण कोटा आणि विविध रेल्वे पासेसवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर तपासणी पथकांचे विशेष लक्ष असेल.

‘टीटीई अ‍ॅप’द्वारे डिजिटल झाडाझडती

स्थानकांवर किंवा प्रवासादरम्यान तिकिटांची सत्यता पडताळण्यासाठी तिकीट तपासणी कर्मचारी आता आधुनिक ‘टीटीई अ‍ॅप’चा वापर करणार आहेत. विशेषतः अनारक्षित तिकिटे आणि ई-तिकिटांची अचूक तपासणी या प्रणालीद्वारे केली जाईल. बनावट तिकिटांवर अथवा इतरांच्या नावाने आरक्षित केलेल्या तिकिटांवर डुलक्या घेणाऱ्यांचा खेळ या अ‍ॅपमुळे लगेच उघडकीस येणार आहे.

ई-पास आणि पीटीओधारकांनाही सुटका नाही

रेल्वे कर्मचारी अथवा पासेसवर प्रवास करणाऱ्यांनाही नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. ई-पास किंवा पीटीओ वर प्रवास करणाऱ्यांनी अधिकृत मूळ ओळखपत्र सोबत बाळगणे आणि प्रवासापूर्वी अधिकृत तिकीट अथवा पास मिळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, वैध तिकिटासोबत प्रवाशांनी स्वतःचे मूळ ओळखपत्र आणि सवलतीची कागदपत्रे बाळगावीत. प्रवासात होणारा मनस्ताप आणि मोठा आर्थिक दंड टाळण्यासाठी प्रवाशांनी तपासणी पथकाला सहकार्य करण्याचे आवाहन मध्य रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT