Rahul Patil Audio Clip Allegations 
जळगाव

Jalgaon Rahul Patil Audio Clip Allegations |शिस्तभंग फक्त सामान्य कार्यकर्त्यांसाठीच का? राहुल पाटील यांचा थेट सवाल

ऑडिओ क्लिप ऐकवत आमदार किशोर पाटील, उन्मेश पाटील आणि जिल्हा प्रमुखांवर घणाघाती आरोप

पुढारी वृत्तसेवा

​चाळीसगाव- "जिल्ह्यात महायुती असल्याच्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशाचे पालन करत मी जिल्हा बँक निवडणुकीत भाजप उमेदवार मंगेश चव्हाण यांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले. केवळ युती धर्म पाळल्यामुळेच माझी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली का? पक्षशिस्त ही केवळ सामान्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठीच आहे का, नेत्यांना ती लागू नाही का?" असा थेट सवाल शिवसेनेचे (शिंदे गट) माजी तालुका प्रमुख राहुल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

पत्रकार परिषदेत कथित ऑडिओ क्लिप ऐकवत त्यांनी आमदार किशोर पाटील, माजी खासदार उन्मेश पाटील आणि जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

दोन दिवसांपूर्वी जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील यांनी व्हॉट्सॲपद्वारे पत्र काढून पक्षविरोधी कारवायांच्या कारणावरून राहुल पाटील यांची हकालपट्टी तसेच चाळीसगावची कार्यकारिणी बरखास्त केल्याचे जाहीर केले होते.

या कारवाईला राहुल पाटील यांनी पत्रकार परिषदेतून सडेतोड प्रत्युत्तर दिले. अद्याप आपल्याला हकालपट्टीचा कोणताही अधिकृत आदेश प्राप्त झालेला नसून, काही नेत्यांनी कार्यालयात बसून परस्पर नवीन पदाधिकारी जाहीर केल्याचा दावा त्यांनी केला. "मी कुठेतरी जड होत असल्यानेच तिघांनी एकत्र येऊन मला संपवण्याचे षडयंत्र रचले आहे. ही पक्षविरोधी कारवाई नसून वैयक्तिक सूडबुद्धी आहे," असा आरोपही त्यांनी केला.

​ऑडिओ क्लिपद्वारे जिल्हाप्रमुख आणि आमदारांवर निशाणा

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीतील काही कथित संभाषणाच्या ऑडिओ क्लिप्स राहुल पाटील यांनी माध्यमांसमोर ऐकवल्या. या क्लिपमध्ये जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील यांचा आवाज असल्याचा दावा करत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील आणि स्थानिक नगरसेवकांच्या फोननंतर आमदारांच्या सांगण्यावरून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांवर माघार घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

​"शिवसेनेचा अधिकृत 'एबी फॉर्म' आणि चिन्ह मिळूनही तांगा आयरे यांच्यासह २ ते ३ निवडून येणाऱ्या उमेदवारांची माघार घेण्यात आली. इतकेच नव्हे तर, शहरप्रमुख सागर चौधरी हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असतानाही पाचोऱ्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दोनदा विनंती करूनही प्रचाराकडे पाठ फिरवली आणि शहर विकास आघाडीच्या मंचावरून शिवसेना उमेदवाराविरोधातच प्रचार केला. मग ही पक्षशिस्तभंग नव्हती का?" असा सवाल पाटील यांनी केला. पक्षवाढीला अडथळा येऊ नये म्हणून आपण वर्षभर शांत राहिलो, मात्र स्वतःवर अन्यायकारक कारवाई झाल्याने नाईलाजाने हे पुरावे समोर आणावे लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

​आमदार किशोर पाटील यांच्या जुन्या मैत्रीची आठवण

आमदार किशोर पाटील यांच्यावर टीका करताना राहुल पाटील म्हणाले की, "युती असताना मंगेश चव्हाण आणि किशोर पाटील यांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते, ते एकाच ताटात जेवायचे. मग अचानक असे काय घडले की त्यांना आता पक्ष आठवू लागला? २०१७-१८ मध्ये भाजपचे ५ ते ६ नगरसेवक शिवसेनेत येण्यास इच्छुक होते, मात्र मंगेश चव्हाण यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळेच किशोर पाटील यांनी टाळाटाळ करून तो प्रवेश होऊ दिला नाही. त्यांनी चाळीसगावमध्ये शिवसेना वाढीसाठी आजवर नेमके काय केले आणि किती बैठका घेतल्या, याचा हिशोब द्यावा."

​'उन्मेश पाटील प्रायव्हेट लिमिटेड'चा कारभार

माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यावरही राहुल पाटील यांनी टीकेची झोड उठवली. "उन्मेश पाटील हे चार पक्ष बदलून आलेले नेते असून त्यांना शिवसेनेचा 'शि' देखील माहित नाही. ते पक्षात केवळ 'उन्मेश पाटील प्रायव्हेट लिमिटेड' कंपनी आणि मित्रमंडळ चालवत आहेत. स्वतःचे नाव टिकवण्यासाठी आणि दाखल होणारे गुन्हे थांबवण्यासाठी ते शिवसेनेत आले आहेत. भाजपने आमदारकी, खासदारकी देऊनही ते एकनिष्ठ राहिले नाहीत. संजय राऊत यांनी शरद पवारांशी भांडून जागा सोडवून दिली, तरीही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी प्रामाणिकपणा दाखवला नाही. विधानसभेत त्यांना मिळालेली ७०-७२ हजार मते ही शरद पवार गटाची होती; तालुक्यात त्यांची स्वतःची ताकद केवळ २ ते ५ हजार मतांचीच आहे," असा घणाघात पाटील यांनी केला. तसेच, जिल्हा बँक निवडणुकीत चाळीसगावची जागा बिनविरोध होऊ नये, केवळ या उद्देशाने पुरेसे मतदान नसतानाही उन्मेश पाटील यांनी कार्यकर्त्यांचे अर्ज दाखल करायला लावल्याचा आरोपही त्यांनी केला.

श्रीकांत शिंदे यांच्या आदेशालाही केराची टोपली

"एकनाथ शिंदे यांच्या उठावाच्या काळात आम्ही लोकांच्या शिव्या खाऊन गावोगावी शाखा उभारल्या आणि पक्ष टिकवला. मात्र, उन्मेश पाटील यांच्या प्रवेशानंतर जुन्या शिवसैनिकांना जाणीवपूर्वक दूर ठेवले जात आहे. यापूर्वी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कानावर हा प्रकार घातल्यानंतर त्यांनी संबंधित नेत्यांना फोन करून 'ज्यांनी कठीण काळात पक्ष वाढवला त्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही, सर्वांना सोबत घेऊन काम करा' असे सक्त आदेश दिले होते. तरीही स्थानिक नेत्यांच्या कार्यपद्धतीत कोणतीही सुधारणा झाली नाही," अशी खंत राहुल पाटील यांनी व्यक्त केली.

​एकनाथ शिंदे व गुलाबराव पाटलांकडे दाद मागणार

"कोणत्याही दबावाला किंवा कारवाईला मी घाबरणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात मी आजन्म शिवसैनिक म्हणूनच काम करत राहणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची पालकमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी. येत्या दोन दिवसांत मी मुंबईत जाऊन एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेणार असून सर्व पुरावे आणि वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडणार आहे. ते निश्चितच मला न्याय देतील. मात्र, ज्यांनी माझी बदनामी करून ही कारवाई घडवून आणली, त्यांना सोडणार नाही," असा थेट इशारा राहुल पाटील यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT