जळगाव : भुसावळ येथील प्राथमिक शिक्षक नूतन पतसंस्था मर्या. मध्ये बनावट कर्जवाटप करून तब्बल 9.90 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी आठ माजी संचालकांसह 16 जणांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.28) रोजी सायंकाळी गोपनीय पद्धतीने करण्यात आली. (Primary Teacher Nutan Society Ltd. Bhusawal)
शासकीय लेखापाल कार्यालयाच्या तपासात गैरव्यवहार उघडकीस आला. लेखापाल प्रकाश चौधरी यांनी याबाबत भुसावळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
संस्थेचे आठ माजी संचालक, व्यवस्थापक, कॅशियर, लिपिक आणि शिपायांचा अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये समावेश आहे. अटक करण्यात आलेल्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना भुसावळ कारागृहात पाठवण्यात आले आहे.
गंगाराम फेगडे (जळगाव), हरिश्चंद्र बोंडे (सावदा), राजू गायकवाड, हितेश नेहेते (भुसावळ), रमेश गाजरे (फैजपूर), कृष्णा सटाले (जामनेर), मधुकर लहासे (पहूर), सुरेश इंगळे (खिरोदा), कैलास तायडे (जळगाव), पंकज ढाके, राहुल चौधरी, जितेंद्र फेगडे (भुसावळ), संजय चौधरी (जामनेर), अझरुद्दीन तडवी, राजेश लहासे, हितेंद्र वाघुळदे (फैजपूर) आर्थिक गुन्हे शाखा पुढील तपास करीत आहेत.