

जळगाव : जळगाव जिल्हा सध्या पुन्हा एकदा वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत आहे. काही काळापूर्वी गाजलेल्या सेक्स स्कँडलप्रमाणेच, आता सीडी आणि हनी ट्रॅप प्रकरणांनी जिल्ह्याच्या प्रतिमेला मोठा धक्का दिला आहे. या घडामोडींमुळे केवळ स्थानिक राजकारण नव्हे, तर विधानसभेपर्यंत वादाचे पडसाद उमटत आहेत.
गिरीश महाजन आणि एकेकाळचे भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पक्षांतर्गत सुरू झालेला हा वाद आता खुलेआम आरोप-प्रत्यारोपांमध्ये रूपांतरित झाला आहे. जामनेर येथील कार्यकर्ता प्रफुल्ल लोढा याच्या अटकेनंतर सीडी आणि हनी ट्रॅप प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
या प्रकरणावर राज्य सरकार कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावरील आरोपांच्या पार्श्वभूमीवर नैतिकतेच्या आधारावर राजीनामा मागितला आहे. “मी जसा राजीनामा दिला, तसा महाजनांनीही द्यावा,” असा खडसेंचा स्पष्ट इशारा आहे. मात्र, या प्रकरणात सरकारकडून अद्याप अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी विधानसभेत विधान केले होते की, “हनी नाही, ट्रॅप नाही,” मात्र आता हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील प्रफुल्ल लोढा याला अटक झाल्यानंतर आणि तो सध्या पोलिस कोठडीत असल्यामुळे या प्रकरणाला नवे स्वरूप लाभले आहे.
या चर्चेत कायम प्रश्न राहतो आहे — सीडी आहे की नाही? आणि असल्यास त्यामध्ये नेमके कोण कोण आहेत? खडसे यांनी थेट आरोप न करता सूचक वक्तव्य करत सरकारकडे कारवाईची मागणी केली आहे. “सीडीमध्ये मंत्री, संत्री आहेत का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
प्रफुल लोढा यांनी यापूर्वी केलेले विधान की, “मी एक बटन दाबले तर संपूर्ण भारत हादरेल,” हे विधानही नव्याने चर्चेत आले आहे. सुरुवातीला हे आरोप महाजनांवर होते, आता तेच आरोप खडसेंवर व त्यांच्या कुटुंबीयांवरही होत आहेत.
सध्या जळगाव जिल्ह्यात तीन मंत्रिपदे आहेत — केंद्रीय राज्य मंत्री (खडसेंच्या सुनबाई), आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि वस्त्रोद्योग विभागाचे शिंदे गटातील मंत्री. असे असूनही जिल्ह्यावरचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.
जिल्ह्यातील राजकारणाला महत्त्व मिळत असले, तरी या सततच्या वादांमुळे जिल्ह्याचे नाव चर्चेत येण्याऐवजी बदनाम होऊ लागले आहे. खडसेंच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मालमत्तेची पाच वेळा चौकशी झाली असून काहीही निष्पन्न झाले नाही. मग गिरीश महाजन यांच्या मालमत्तेचीही चौकशी व्हावी, अशी मागणी पुढे येत आहे.
एकंदरीतच, हनी ट्रॅप आणि सीडी प्रकरणात नेत्यांची नावे पुढे येत असल्याने प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होत आहे. जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात यापूर्वीही अशा प्रकारची वादग्रस्त प्रकरणे घडली आहेत. आता या प्रकरणाला पूर्णविराम मिळणार की आणखी नवे अध्याय उघडले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.