Raver Ganesh temple
रावेर : जळगाव जिल्ह्यातील रावेर शहर मध्यप्रदेशच्या सीमेवर वसलेले असून जगप्रसिद्ध केळी उत्पादनासाठी हे ठिकाण ओळखले जाते. याच शहरात भाविकांच्या अपार श्रद्धेचं केंद्र असलेला “पारावरचा गणपती” विराजमान आहे.
अंदाजे तीनशे ते साडेतीनशे वर्षांपूर्वी या ठिकाणी श्री गणेशाची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. 200 वर्षांपूर्वी गणेशभक्त श्री उदेकर यांना स्वप्नात श्री गणेशाने दृष्टांत दिल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली ही मूर्ती सापडली. ही मूर्ती वाळूच्या कणांनी बनलेली असून पिंपळाच्या झाडावरही गणेशाची प्रतिमा कोरलेली दिसते.
रावेर येथील पारावरच्या गणपतीची आख्यायिका
गणेश भक्त असलेले उदेकर गणेशावर फार मोठी श्रद्धा होती. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी त्यांच्या स्वप्नात श्री गणेशाने दर्शन देऊन घराजवळील पाराजवळ खोद तेथे माझी मूर्ती सापडेल, असा दृष्टांत त्यांना दिला होता. त्यानंतर उदेकर यांच्यासह अजून काही भाविक भक्तांनी पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन तिथे खोदकाम केले असता त्या ठिकाणी श्री गणेशाची स्वयंभू वाळूची मूर्ती सापडली. ही मूर्ती वाळू कणांनी तयार झालेली आहे. तेव्हापासून या गणपतीला पारावरचा किंवा नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखला जातो.
स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार, हा गणपती “ग्रामरक्षक” मानला जातो. गावात कोणताही सण, उत्सव, लग्न किंवा महत्त्वाचं कार्य असलं की भाविक पारावरच्या गणपतीचं दर्शन घेऊनच सुरुवात करतात. असे मानले जाते की या गणपतीच्या दर्शनाने अडथळे दूर होतात आणि कार्य सिद्धी मिळते.
गणेशोत्सवात या मंदिरात भजन, कीर्तन, गजरासह मोठ्या भक्तिभावाने उत्सव साजरा केला जातो. अनेक रावेरकरांच्या दिवसाची सुरुवात पारावरच्या गणपतीच्या दर्शनानेच होते. गेल्या 50 वर्षांपासून वाणी कुटुंबियांना पहिल्या आरतीचा मान मिळत असून आता ही परंपरा पुढच्या पिढीकडे चालू आहे. रावेर तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील गणेशभक्तांसाठी पारावरचा गणपती हे एक प्रमुख श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखला जातो.