

जळगाव : यंदा जिल्ह्यात एकूण 2946 गणेश मंडळांमध्ये श्रीं ची प्रतिष्ठापना झाली असून त्यामध्ये 177 गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ राबवण्यात आला आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनासह स्वयंसेवक व कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
गणेश मंडळांची संख्या अशी..
एकूण गणेश मंडळे – 2946
‘एक गाव एक गणपती’ – 177
खाजगी गणपती मंडळे – 697
सार्वजनिक गणपती मंडळे – 2089
चाळीसगाव ग्रामीण (24), मारवड (12), चोपडा ग्रामीण (10) आणि चोपडा शहर (9) या ठिकाणी सर्वाधिक ‘एक गाव एक गणपती’ बसविण्यात आला आहे.
जळगाव शहर, शनिपेठ, रामानंद, भुसावळ शहर आणि भुसावळ बाजारपेठ येथे मात्र एकही ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबविण्यात आलेला नाही. ठिकठिकाणी गणेशोत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह होमगार्ड 1800, SRPF करीता अमरावती येथून एक पथक पाचारण करण्यात आले आहे तर CISF कडून कोणीही बोलवण्यात आलेले नाही.
कायदा व सुव्यवस्था राखत गणेशोत्सव सण शांततेत पार पडावा, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पोलीस पथकास मार्गदर्शक सूचना दिल्या असून मूर्ती व मंडप वाहतुकीस अडथळा ठरणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. महत्वाच्या मंडळांनी CCTV कॅमेरे लावणे आणि 24 तास स्वयंसेवकांची नेमणूक करणे आवश्यक केले आहे. तसेच महिला व पुरुष भक्तांसाठी स्वतंत्र रांग व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी सांगण्यात आले आहे. गणेश मंडपाने ध्वनीप्रदूषणासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचे नियम काटेकोरपणे पाळण्यासंबंधी बजावण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी ठरवलेल्या विशिष्ट दिवसांनाच रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी देण्यात आली असून गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी ३१ ऑगस्ट रोजी (पाचवा दिवस), २ सप्टेंबर (सातवा दिवस) आणि ६ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) सुट देण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने सर्व मंडळे व भक्तांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.