

जळगाव: जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची मागणी यशस्वी ठरली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील २९ शहीद जवानांच्या स्मारकांसाठी ४ कोटी ३५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे युद्धात आणि युद्धजन्य परिस्थितीत देशासाठी प्राणार्पण केलेल्या वीर सुपुत्रांच्या गावात आता प्रेरणादायी स्मारके उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पालकमंत्र्यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद
जिल्हा वार्षिक योजनेच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ही महत्त्वपूर्ण मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मांडली होती. जिल्ह्यातील शहीद जवानांच्या बलिदानाला आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी प्रत्येक गावात स्मारक उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती.
असा मिळणार निधी
शासनाच्या या निर्णयानुसार, प्रत्येक स्मारकासाठी १५ लाख रुपये याप्रमाणे एकूण २९ स्मारकांसाठी ४३५ लाख रुपये (४.३५ कोटी रुपये) 'एक वेळची विशेष बाब' म्हणून मंजूर करण्यात आले आहेत. हा निधी जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून उपलब्ध करून दिला जाणार आहे. याबाबतचे अधिकृत आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांना शासनाने कळवले आहेत.
गावागावात उभारणार शौर्याची प्रेरणा केंद्रे
या निर्णयामुळे जिल्ह्यातील २९ गावांमध्ये केवळ ऐतिहासिक स्मारकेच उभारली जाणार नाहीत, तर शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यासोबतच भावी पिढ्यांसाठी ही स्थळे प्रेरणा केंद्र म्हणून विकसित होतील. या माध्यमातून प्रत्येक गावात शौर्याचा आणि देशभक्तीचा वारसा जपला जाणार असून, शहीद वीरांचे बलिदान कायम स्मरणात राहील.