Murder Case Pudhari
जळगाव

Jalgaon Crime | पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा राग: तरुणाचा खून करून मृतदेहाची लावली विल्हेवाट

पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील घटनेने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Pachora Murder Case

जळगाव : मोबाईलमध्ये असलेल्या अश्लील व्हिडिओच्या कारणावरून एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा क्रमांक ३ येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणात पती-पत्नीने संगनमताने तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह गायब करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत विजय भिमा राठोड याने आरोपी सोनाली संजय जाधव हिचे काही अश्लील व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केले होते. ही बाब तिचा पती संजय परशुराम जाधव याला समजताच दोघांमध्ये संताप निर्माण झाला. त्यातूनच विजय राठोड याचा कायमचा बंदोबस्त करण्याचा कट पती-पत्नीने रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

२४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजेच्या सुमारास आरोपींनी विजयवर हल्ला करून त्याची हत्या केली. गुन्ह्याचा कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून त्यांनी मृतदेह अज्ञात ठिकाणी नेऊन त्याची विल्हेवाट लावल्याचेही समोर आले आहे. विजय काही दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला होता. तपासादरम्यान संशयाची सुई संजय जाधव व त्याची पत्नी सोनाली यांच्याकडे वळल्याने संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

याप्रकरणी मृत विजयचा भाऊ संजय भीमा राठोड (वय २५) यांनी फिर्याद दिल्यानंतर पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत १३ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजता संजय परशुराम जाधव आणि सोनाली संजय जाधव या दोघांना अटक केली.

दरम्यान, विजय राठोड याची हत्या नेमकी कशी करण्यात आली आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावण्यात आली याचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली असून अश्लील व्हिडिओच्या कारणावरून घडलेल्या या हत्येची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT