जळगाव : जिल्ह्यात वारंवार गुन्हेगारी कृत्ये करून शांतता भंग करणाऱ्या आणि पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईला थारा न देणाऱ्या गुंडांविरुद्ध आता खाकीने कडक पाऊल उचलले आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील एकूण ६ सराईत गुन्हेगारांना जळगाव जिल्ह्यातून १ वर्षासाठी 'हद्दपार' (तडीपार) करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. ४) या संदर्भातील आदेश जारी केल्याने गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून सर्वसामान्यांच्या शांततेला तडा जाऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत विविध पोलीस ठाण्यांकडून सराईत गुन्हेगारांचे हद्दपारीचे प्रस्ताव पाठवण्यात आले होते. या प्रस्तावांवर सुनावणी घेतल्यानंतर, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ व ५७ नुसार सहा जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
या गुन्हेगारांना दाखवला बाहेरचा रस्ता
१) सुनील पांडुरंग पारधी (रा. फत्तेपूर, ता. जामनेर)
२) विजय पांडुरंग पारधी (रा. फत्तेपूर, ता. जामनेर)
३) अमोल ऊर्फ चिक्या शंकर कोकाटे (रा. हरिविठ्ठल नगर, जळगाव)
४) महेंद्र ऊर्फ दादू समाधान सपकाळे (रा. पिंप्राळा, जळगाव)
५) उमेश ऊर्फ उमाकांत दत्तात्रेय धोबी (रा. पिंप्राळा, जळगाव)
६) फिरोजशहा नूर शहा (रा. मोमीन मोहल्ला, नशिराबाद)
जळगाव शहर आणि उपविभागातील सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.