Pachora Crime News AI Image
जळगाव

Pachora Crime News | पाचोरा हादरले! पीएसआयच्या घराला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न; आईच्या सतर्कतेने टळला अनर्थ

Pachora Crime News | आईची सतर्कता ठरली ‘देवदूत’; सीसीटीव्हीत दोन नराधम कैद; पाचोरा पोलीस हादरले, गुन्हेगारांचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

जळगाव

गुन्हेगारांची हिंमत आता इतकी वाढली आहे की, चक्क कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या घरालाच आग लावण्याचे धाडस ते करू लागले आहेत. नगरदेवळा (ता. पाचोरा) येथील रहिवासी आणि मुंबईत कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र उमेशसिंग राऊळ यांच्या घराला ७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री अज्ञातांनी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, आईच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असला तरी, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मध्यरात्री अडीच वाजता काळाचा घाला!
राऊळ गल्ली परिसरात असलेल्या पीएसआय देवेंद्र राऊळ यांच्या राहत्या घरी त्यांची आई नंदकोर राऊळ आणि बहीण किरण राऊळ झोपलेल्या होत्या. मध्यरात्री २:३० च्या सुमारास अचानक घराबाहेर काही हालचाल झाली आणि पेट्रोलचा वास सुटला. इतक्यात अज्ञातांनी दरवाजाला आग लावली. धुराच्या वासामुळे आई नंदकोर यांना जाग आली असता, त्यांना घराच्या दरवाजाचा पडदा जळताना दिसला. सुरुवातीला शॉर्ट सर्किट वाटले, पण दरवाजा उघडल्यावर बाहेर पेट्रोलची बाटली आणि आगपेटी पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

आई आणि बहिणीची तत्परता; मोठा अनर्थ टळला!
नंदकोर राऊळ यांनी तातडीने मुलगी किरणला उठवून पाण्याने आग विझवली आणि आरडाओरडा करून शेजाऱ्यांना बोलावले. जर थोडाही उशीर झाला असता, तर संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असते. पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र राऊळ यांनी मुंबईतूनच पाचोरा पोलीस दूरक्षेत्राला या गंभीर घटनेची माहिती दिली.

सीसीटीव्हीत ‘विना क्रमांकाची’ दुचाकी कैद!
परिसरातील किराणा दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अज्ञात इसम विना क्रमांकाच्या मोटारसायकलवर संशयास्पद रित्या फिरताना दिसत आहेत. गणपती मंदिराजवळ गाडी लावून ते गल्लीच्या दिशेने जाताना फुटेजमध्ये कैद झाले आहेत. विशेष म्हणजे, या नराधमांनी पूर्ण नियोजित कट रचूनच हा हल्ला केल्याचे दिसत आहे.

पोलीस उपनिरीक्षकाची चिंता
"राहत्या घरावर असा हल्ला होणे अत्यंत भीतीदायक आहे. कोणाशीही वाद नसल्याने संशय कोणावर घ्यावा हे समजत नाही. घरात आई आणि बहीण असल्याने त्यांच्या सुरक्षिततेची चिंता अधिक वाढली आहे," अशी हतबल प्रतिक्रिया देवेंद्र राऊळ यांनी दिली आहे.

पाचोरा पोलिसांसमोर तपासाचे आव्हान!
या प्रकरणी किरण राऊळ यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवस्तीत एका पोलीस अधिकाऱ्याच्या घराला आग लावण्याचा प्रयत्न होतोच कसा? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. आता पाचोरा पोलीस त्या सीसीटीव्हीतील आरोपींच्या मुसक्या कधी आवळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT