NCP Jalgaon Pudhari
जळगाव

NCP Jalgaon | जळगाव महापालिकेत ‘दादा’ गटाला धक्का; महायुतीत असूनही समित्यांत स्थान नाही

१६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष महासभेत स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Municipal Corporation

जळगाव : जळगाव महानगरपालिकेतील सत्तासमीकरणात नवा पेच निर्माण झाला आहे. महायुतीचा भाग असूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वाट्याला समित्यांमध्ये एकही जागा येणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. १६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष महासभेत स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड होणार आहे.

महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर आता लक्ष समिती रचनेकडे लागले होते. शुक्रवारी महापौर दीपमाला काळे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत समित्यांचे संख्याबळ आणि वाटपाचे सूत्र निश्चित करण्यात आले. त्यानुसार १६ फेब्रुवारीला विशेष महासभा बोलावण्यात आल्याची माहिती महापौर काळे यांनी दिली.

मनपातील ७५ नगरसेवकांच्या संख्याबळाच्या आधारे समित्यांचे वाटप करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे केवळ एकच नगरसेवक असल्याने गणितानुसार त्यांना कोणत्याही समितीत प्रतिनिधित्व मिळू शकलेले नाही. महायुतीत सहभाग असूनही समिती रचनेतून बाहेर राहावे लागल्याने राष्ट्रवादी गटात नाराजीचे वातावरण आहे.

समित्यांचे प्रस्तावित संख्याबळ पुढीलप्रमाणे :

स्थायी समिती (एकूण १६ सदस्य)

भाजप : १०

शिवसेना (शिंदे गट) : ५

उद्धव बाळासाहेब ठाकरे गट : १

राष्ट्रवादी (अजित पवार गट) : ०

महिला व बालकल्याण समिती (एकूण ९ सदस्य)

भाजप : ५

शिवसेना (शिंदे गट) : ३

उद्धव बाळासाहेब ठाकरे गट : १

राष्ट्रवादी (अजित पवार गट) : ०

बैठकीस महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, भाजप गटनेते प्रकाश बालानी, उपगटनेते नितीन बरडे, प्रतोद डॉ. चंद्रशेखर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, भाजप शहराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नितीन लठ्ठा, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल देवकर, ठाकरे गटाचे इबा पटेल यांच्यासह आयुक्त व नगरसचिव उपस्थित होते.

आता १६ तारखेला होणाऱ्या विशेष महासभेत सदस्यांची अधिकृत निवड होणार असून, या राजकीय समीकरणांचे पुढे काय परिणाम होतात याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT