

जळगाव : जिल्ह्यात सध्या लग्नसराईचा धूमधडाका सुरू असतानाच चोरट्यांनी आता आपला मोर्चा थेट धावत्या बसमधील वऱ्हाड्यांकडे वळवला आहे. जळगावहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या बसमध्ये एका ५२ वर्षीय महिलेच्या पिशवीला कटरने काप देऊन ३८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या धाडसी चोरीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
लग्नाचे वऱ्हाड झाले 'लक्ष्य'
पिंप्राळा परिसरातील बारी वाड्यात राहणाऱ्या सुनीता अशोक बारी (वय ५२) या मंगळवारी (दि. १०) सकाळी जळगावहून पाळधी (पहूर) येथे एका विवाह सोहळ्यासाठी जात होत्या. जळगाव-छत्रपती संभाजीनगर बसने प्रवास करत असताना सकाळी ११.४५ ते दुपारी १२.५० च्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. बसमध्ये प्रवाशांची गर्दी असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने सुनीता बारी यांच्या हातातील कापडी पिशवीला धारदार वस्तूने (कटरने) कापले.
९० हजारांचा ऐवज चोरीला
पिशवी कापून चोरट्याने आतील ३२ ग्रॅम वजनाची सोन्याची सहा पेंडंट असलेली मंगलपोत आणि ६ ग्रॅम वजनाचे कानातले जुमके, असा एकूण ३८ ग्रॅम वजनाचा आणि सुमारे ९० हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज अत्यंत शिताफीने लंपास केला. चोरीचा हा प्रकार इतक्या सफाईदारपणे करण्यात आला की, सुनीता अशोक बारी यांना त्याची वेळीच पुसटशी कल्पनाही आली नाही.
जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल
पाळधी येथे पोहोचल्यानंतर पिशवी कापलेली असल्याचे आणि दागिने गायब असल्याचे लक्षात येताच सुनीता बारी यांना धक्का बसला. त्यांनी तात्काळ जळगाव गाठून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे (गु.आर.क्र. ००२८/२०२६). पुढील तपास जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल भटू पाटील (बक्कल नंबर २९८८) करत आहेत. चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन हा हात साफ केल्याने बस स्थानक आणि धावत्या बसमधील सुरक्षा यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.