

जळगाव : भुसावळ शहरात चोरांचे धाडस दिवसेंदिवस वाढत चालले असून, आता मंगल कार्यालयेही असुरक्षित बनली आहेत. भुसावळ येथील प्रसिद्ध बालाजी हॉलमध्ये एका कार्यक्रमादरम्यान अज्ञात चोरट्याने महिलेच्या संमतीशिवाय सोफ्यावर ठेवलेली पर्स लंपास केली. या पर्समध्ये सुमारे २ लाख ४९ हजार १४० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम होती. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून बाजारपेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
प्रल्हाद नगर येथील रहिवासी उज्वल प्रबोध भावे (वय ५०) या ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ च्या सुमारास शहरातील बालाजी हॉल येथे गेल्या होत्या. दुपारी ४ ते ४:३० च्या दरम्यान त्यांनी आपली पर्स हॉलमधील सोफ्यावर ठेवली होती. हीच संधी साधून तिथे दबा धरून बसलेल्या अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने अडीच लाखांचा ऐवज असलेली पर्स चोरून नेली. काही वेळातच आपली पर्स जागेवर नसल्याचे लक्षात येताच भावे यांनी शोधाशोध केली, मात्र चोरटा पसार झाला होता.
अडीच लाखांचा ऐवज लंपास
चोरट्याने पळवलेल्या पर्समध्ये खालील मुद्देमाल होता;
१) ४० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत (किंमत १,९२,४०० रुपये)
२) ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स (किंमत २४,००० रुपये)
३) ४.४२ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (किंमत २०,३०० रुपये)
४) चांदीची वाटी आणि लवंगा (किंमत सुमारे २५०० रुपये)
५) १०,००० रुपये रोख रक्कम.
पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
या प्रकरणी १० फेब्रुवारी रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारती काळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा माग काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, भरवस्तीत आणि गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे चोरी झाल्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मंगल कार्यालयात सावध राहा
लग्नसराई आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या निमित्ताने मंगल कार्यालयांमध्ये मोठी गर्दी असते. अशा वेळी दागिने आणि मौल्यवान वस्तू असलेली पर्स सोफ्यावर किंवा खुर्चीवर ठेवून विसरणे धोक्याचे ठरू शकते. नागरिकांनी आपल्या साहित्याची स्वतः काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.