जळगाव

जळगावात ५ वाळू माफियांसह हातभट्टीची दारु विकणाऱ्या महिलेवर एमपीडीएची कारवाई

गणेश सोनवणे

जळगाव-आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील ६ जणांविरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई करत स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दि. १९ रोजी काढले आहे. यात ५ वाळू माफिया तर गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या महिलेचा समावेश आहे.

गेल्या महिन्यात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या वाळू माफिया विशाल उर्फ विक्की उर्फ मांडवा नामदेव सपकाळे (वय २८, रा. शंकरराव नगर), संदीप गणेश ठाकूर (वय ३०, रा. डीएनसी कॉलेज), विलास वामन कोळी (वय ३८, रा.जळगाव खुर्द, ता. जळगाव), शांताराम सुका बोरसे (वय ४५, रा. जळगाव खुर्द, ता. जळगाव), भैय्या मंगल पाटील (वय ३०, रा. चोपडा) यांच्यासह छायाबाई रमेश सकट (वय ५८, रा. राजीवगांधी नगर, जळगाव) या हातभट्टी दारु विकणाऱ्यांसह वाळूमाफियांविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यांना वर्षभरासाठी राज्यातील विविध कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस दलाकडून कठोर कारवाईचे पाऊले उचलली जात आहे. यामध्ये रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांसह वाळू माफियांसह अवैध हातभट्टीची दारु विकणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. दरम्यान, अवैध वाळू वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर हल्ला करणारा वाळूमाफिया विशाल उर्फ मांडवा सपकाळे याच्याविरुद्ध प्राणघातक हल्ला यासह वाळू चोरीचे चार गंभीर गुन्हे दाखल आहे. तसेच त्याचा साथीदार संदीप गणेश ठाकूर या वाळू माफियाविरुद्ध देखील वाळूचोरीसह तीन गंभीर गुन्हे दाखल आहे. जळगाव खुर्द येथील विलास कोळी याच्याविरुद्ध दारुबंदी कायद्यांतर्गत ९ गुन्हे तर शांताराम सुका बोरसे याच्याविरुद्ध ७ गुन्हे दाखल आहे. त्यामुळे याचा चौघांवरील कारवाईचा प्रस्ताव नशिराबाद पोलीस ठाण्याचे सपोनि रामेश्र्वर मोताळे यांनी तयार केला.

तर दुसरीकडे जळगाव शहरातील राजीव गांधी नगरातील छायाबाई रमेश सकट यांच्याविरुद्ध वेगवेगळे ८ गंभीर गुन्हे असल्याने रामानंद नगर पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी तर चोपडा येथील भैय्या मंगल पाटील या हातभट्टीची दारु तयार करु न विकणाऱ्यांचा प्रस्ताव चोपडा शहरचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी तयार करुन तो पोलीस अधीक्षकांकडे पाठविला होता. या सहा जणांच्या प्रस्तावाचे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी अवलोकन करून तो मंजूरीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे पाठविला. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी दि. १९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता सहा प्रस्तांवाना मंजूरी दिल्यानंतर त्यांवर एमपीडीएतंर्गत कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा –

SCROLL FOR NEXT