DD News चा लोगो, रंग बदलला, सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया | पुढारी

DD News चा लोगो, रंग बदलला, सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय वृत्त प्रसारक डीडी न्यूजच्या लोगोचा रंग बदलण्यात आला आहे. डीडी न्यूजच्या अधिकृत एक्स हँडलवरून यासंदर्भात पोस्ट करून माहिती देण्यात आली आहे. लोगोचा रंग बदलल्याने सोशल मीडियावर या बदलावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. डीडी न्यूज या सरकारी वृत्तवाहिनीवरील बदलामुळे अनेक नेटकऱ्यांनी यावर टीका केली आहे तर काहींनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

सरकारी प्रसारक डीडी न्यूज या न्यूज टेलिव्हिजन चॅनेलने लाल रंगाच्या जागी भगव्या रंगाचा नवीन लोगो लॉन्च केला आहे. सरकारी वृत्त वाहिनीने सोशल मीडिया पोस्टमध्ये नवीन लोगोचे अनावरण करत म्हटले की, चॅनेलची मूल्ये समान राहिली तरी ती “आता नवीन अवतारात उपलब्ध आहे”. डीडी न्यूजच्या अधिकृत एक्स हँडलवरून पोस्ट करून ही माहिती देण्यात आली आहे.

पुढे पोस्टमध्ये लिहिले आहे की, पूर्वी कधीच नसलेल्या बातम्यांच्या प्रवासासाठी सज्ज व्हा. अगदी नवीन डीडी न्यूजचा अनुभव घ्या. वेगापेक्षा अचूकता, दाव्यांपेक्षा तथ्य आणि संवेदनापेक्षा सत्य मांडण्याचे धैर्य आपल्याकडे आहे. कारण डीडी न्यूजवर असेल तर ते खरे असेल, असे देखील डीडी न्यूजने म्हटले आहे.

सरकारी वृत्त प्रसारक डीडी न्यूजमधील या बदलानंतर सोशल मीडिया युजर्सनी टीका केली आहे. युजर्संनी म्हटले आहे की, हे सरकारी प्रसारकाचे “भगवाकरण” आहे. मार्चमध्ये दूरदर्शन नॅशनलने सांगितले होते की, ते दररोज सकाळी ६.३० वाजता अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या आरती सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करेल, असेदेखील स्पष्ट केले होते.

>

 

 

Back to top button