जळगाव:
शहरातील एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोठी कारवाई करत, कार चोरीचा गुन्हा अवघ्या चार दिवसांत उघडकीस आणला आहे. या कारवाईत चोरीला गेलेली सुमारे ४,५०,००० रुपये किंमतीची मारुती स्विफ्ट डिझायर (Swift Dzire) कार हस्तगत करण्यात आली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील एका रहिवाशाने 19 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजता आपल्या घरासमोर मारुती स्विफ्ट डिझायर कार पार्क केली होती.
मात्र, दुसऱ्या दिवशी, 20 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी कार जागेवर दिसून न आल्याने चोरीची खात्री झाली.
परिसरात शोध घेतला पण कार सापडली नाही. त्यामुळे अज्ञात चोरट्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. 857/2025, भा.न्या.सं. 2023 चे कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे अन्वेषण पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केल्यानंतर संशयिताची ओळख पटवण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, 23 नोव्हेंबर 2025 रोजी जळगाव येथील नवनाथ नगर परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान आरोपीने स्वतःचे नाव विनय मनोहर जाधव (रा. नवनाथ नगर, जळगाव) असे सांगितले आणि कार चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपीने चोरी केलेली कार छत्रपती संभाजी नगर येथे नेल्याचे उघड झाल्याने तातडीने कारवाई करून, पोलिसांनी ४.५० लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार जप्त केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
या पथकामध्ये चौधरी, गिरीश पाटील, विशाल कोळी, नितीन ठाकूर, किरण पाटील, शशिकांत मराठे, नरेंद्र मोरे या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. उल्लेखनीय कार्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे कौतुक केले आहे.