

जळगाव : भुसावळ शहरातील शारदानगर परिसरातील गोपाळ अपार्टमेंटमध्ये दिवसा घरफोडी करून चोरट्यांनी दोन लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लॉट क्रमांक 5 मधील कुलकर्णी दांपत्य कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यांचा मुलगाही शाळेत होता. मंगळवार (दि.25) रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी सव्वा एक या वेळेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटे उचकून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण दोन लाख 61 हजार रुपयांचा ऐवज त्यांनी चोरून नेला. या घटनेबाबत निलेश भालचंद्र कुलकर्णी यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे करीत आहेत.