Youth Beaten In Bhusawal
जळगाव : कामाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका १८ वर्षीय तरुणाला विवस्त्र करून पट्टा व चाबकाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना भुसावळ शहरात घडली आहे. एवढ्यावरच न थांबता संशयितांनी तरुणाच्या गळ्यातील चांदीची साखळी, हातातील ब्रेसलेट आणि खिशातील वस्तू काढून घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभाष नगर येथील रहिवासी श्रीनील महेश देशमुख (वय १८) याने याबाबत फिर्याद दिली आहे. २३ एप्रिल रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास त्याचा मित्र सौरभ सोनवणे याने फोन करून त्याला भेटण्यासाठी बोलावले. त्यानुसार श्रीनील हा आपल्या बुलेटवरून भारत नगर येथे गेला. तेथून सौरभ सोनवणे, सिद्धेश महाडीक आणि सागर साळुंके यांच्यासोबत तो फिरण्यासाठी गेला.
त्यानंतर सर्वजण अशोक वाईन्स येथून दारू घेऊन जामनेर रोडवरील साईबाबा मंदिरामागील डम्पिंग यार्डजवळील एका पडक्या घरात बसले होते. सायंकाळी चारच्या सुमारास सौरभने श्रीनीलला, “तू माझ्या गर्लफ्रेंडकडे सहा महिन्यांपूर्वी का बघत होतास?” असा जाब विचारला.
श्रीनीलने उत्तर देण्याचा प्रयत्न केला असता सौरभने त्याच्या गालावर आणि पोटावर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने सिद्धेश महाडीक आणि सागर साळुंके यांनाही चिथावल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तिघांनी मिळून श्रीनीलला विवस्त्र करून खाली पाडले आणि पट्टा व चाबकाने त्याच्या पाठीवर मारहाण केली.
मारहाणीनंतर सौरभने वासिफ शेख याला फोन करून घटनास्थळी बोलावले. वासिफ तेथे आल्यानंतर श्रीनीलला त्याच्या वाहनावर बसवून मुस्लिम कॉलनीतील कब्रस्तानाकडे नेण्यात आले. सायंकाळी पाचच्या सुमारास सागर साळुंके आणि सिद्धेश महाडीक हेही तेथे पोहोचले.
फिर्यादीनुसार, तेथे सौरभने श्रीनीलच्या गळ्यातील सोन्याचे दोन मणी तोडून पुन्हा मारहाण केली. त्यानंतर त्याला पांडुरंग टॉकीजजवळ नेण्यात आले. तेथे त्याच्या गळ्यातील चांदीची साखळी आणि उजव्या हातातील चांदीचे ब्रेसलेट काढून घेण्यात आले.
घटनेनंतर घाबरलेला श्रीनील घरी परतला. त्याने आपल्या पालकांना आणि भावाला घडलेला प्रकार सांगितला. मारहाणीत दुखापत झाल्याने त्याच्यावर भुसावळ पोलिसांच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्याने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
श्रीनील देशमुख यांच्या फिर्यादीवरून २४ एप्रिल रोजी सौरभ सोनवणे (भारत नगर), सिद्धेश महाडीक (रेड चर्चजवळ, कृष्णा कॉलनी), सागर साळुंके (भारत नगर) आणि वासिफ शेख (खडका चौफुली, ईदगाहजवळ) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भुसावळ शहर पोलीस करीत आहेत.