file photo
जळगाव

शेतकऱ्यांच्या डिझेलला 'ब्रेक'; तर तिकडे जागांवरून महायुतीत 'काटाजोड'

आगामी काळात जळगावचे राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात सध्या एका बाजूला प्रशासकीय निर्णयामुळे बळीराजाची कोंडी झाली आहे, तर दुसऱ्या बाजूला आगामी विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीमधील राजकीय कलगीतुरा रंगू लागला आहे. स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना डिझेल मिळण्यात अडचणी निर्माण झाल्याने पैनिक परिस्थिती निर्माण झाली असतानाच, महायुतीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. त्यातच आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या एका वक्तव्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मारलेली राजकीय कोपरखडी सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चेचा विषय ठरली आहे.

बैलजोडी गेली, आता ट्रॅक्टर चालवायचा कसा? शेतकऱ्यांच्या डिझेलवर 'टाच'

ऐन हंगामाच्या तोंडावर बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे. सुरक्षेचे कारण पुढे करत स्थानिक पेट्रोल पंपांवरून सुट्या कॅन किंवा पिंपात (लोकल टाकी) डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशामुळे जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर विषयावर आजच जिल्हाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाली असून, यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. आजकाल सालदार आणि बैलजोडीने शेती करण्याचे दिवस संपले आहेत. शेतीचे पूर्णपणे यांत्रिकीकरण झाले असून कोळपणी असो की पेरणी, सगळी कामे ट्रॅक्टरच्या साहाय्यानेच होतात. अशा वेळी शेतकऱ्याला शेतावरून ट्रॅक्टर थेट पंपावर आणणे दरवेळी शक्य नसते.

विधान परिषदेवरून महायुतीत 'काटाजोड'! शिंदे गट ७ जागांवर अडला

मुंबईच्या राजकीय वर्तुळातून जळगावात पोहोचलेले वृत्त सांगते की, विधान परिषदेच्या जागांवरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जोरदार वाद पेटला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट ७ जागांवर ठामपणे अडकून बसला आहे. भाजप मात्र केवळ ४ जागा देण्यास तयार असल्याने जागावाटपाचा तिढा वाढला आहे. या संदर्भात महायुतीच्या जळगावमधील सूत्रांनी स्पष्ट केले की, वरिष्ठ पातळीवर येत्या एक-दोन दिवसांत यावर अंतिम निर्णय होईल. आम्ही 'जळगाव'च्या जागेची आग्रही मागणी केली असून, जर ही जागा आम्हाला सुटली तर शिवसेना-भाजप आणि महायुती म्हणून आम्ही ही जागा १०० टक्के ताकदीने खेचून आणू, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

किशोर आप्पांच्या 'मैत्रीपूर्ण' गणितावर गुलाबरावांचा 'गुलाबजाम'

जळगावच्या राजकारणात सध्या अंतर्गत धुसफूस देखील पाहायला मिळत आहे. प्रताप पाटील यांनी जर विधान परिषदेत 'मैत्रीपूर्ण लढत' लढण्याचा निर्णय घेतला, तर आम्ही त्यांना पूर्ण ताकदीने पाठिंबा देऊ, असे वक्तव्य आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले होते. किशोर आप्पांच्या या भूमिकेचा समाचार घेताना आपल्या नेहमीच्या गावरान आणि आक्रमक शैलीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला. मैत्रीपूर्ण लढतीचे निर्णय घेण्याआधी त्यांनी स्वतः आधी मुख्यमंत्र्यांचा म्हणजेच 'शिंदे साहेबांचा' सल्ला घ्यावा, असे गुलाबराव पाटलांच्या या कोपरखडीमुळे महायुतीच्या अंतर्गत नेत्यांमधील विसंवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, आगामी काळात जळगावचे राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT