Jalgaon News
जळगाव: कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट शेतकऱ्यांचा पाठ सोडायला तयार नाहीत. जळगाव जिल्ह्यात धरणगाव आणि जामनेर तालुक्यात महावितरणच्या गलथान कारभारामुळे लागलेल्या आगीत दोन शेतकऱ्यांचे मिळून सुमारे २ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे उडालेल्या ठिणग्यांनी उभी पिके आणि सिंचनाचे साहित्य गिळंकृत केल्याने या परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
धरणगाव येथील डॉ. हेडगेवार नगर शिवारातील शेत गट क्रमांक ११७ मध्ये महावितरणच्या इलेक्ट्रिक डीपीवर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. वाऱ्यामुळे डीपीवरून उडालेली ठिणगी थेट शेतात पडल्याने तुषार वसंत चौधरी या तरुण शेतकऱ्याच्या ५ बिघे मका पिकापैकी ३ बिघे पीक पूर्णपणे जळून खाक झाले.
या आगीत केवळ उभे पीकच नव्हे, तर पिकाला पाणी देण्यासाठी अंथरलेल्या ठिबकच्या नळ्या आणि ६ पीव्हीसी पाईपही जळाले. यात शेतकऱ्याचे सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. धरणगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी 'अकस्मात आग' म्हणून नोंद करण्यात आली असून पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील अधिक तपास करत आहेत.
दुसरी घटना जामनेर तालुक्यातील करमाड शिवारात घडली. २६ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास समाधान सुरेश पाटील (रा. पळसखेडा मिराचे) यांच्या शेतातून गेलेल्या इलेक्ट्रिक पोलवरील तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाले. या तारांमधून उडालेली आग खाली पडल्याने क्षणात रौद्र रूप धारण केले.
या आगीत पाटील यांच्या ३ एकर क्षेत्रातील जैन कंपनीच्या ठिबक नळ्या (किंमत १ लाख ४० हजार) आणि ५० हजार रुपयांचा ज्वारीचा कडबा तसेच भुसा जळून खाक झाला. एकूण १ लाख ९० हजार रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश भावसार या प्रकरणाचा तपास करत आहेत.