Dnyaneshwar More case protest  
जळगाव

Dnyaneshwar More case|कुंभारीतील ज्ञानेश्वर मोरे हत्याकांड : मारेकऱ्यांना फाशी द्या, ‘एसआयटी’ नेमा! सकल राजपूत समाज आक्रमक

५० लाखांची मदत, मुलाला नोकरी अन् फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची जोरदार मागणी

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जामनेर तालुक्यातील कुंभारी येथे किरकोळ वादातून ज्ञानेश्वर उत्तमसिंग मोरे यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप उसळला आहे. हत्याकांड आणि मृतदेहाची करण्यात आलेली विटंबना याविरोधात सकल राजपूत समाजाने गुरुवारी (दि. १) प्रशासनावर थेट धडक देत जोरदार एल्गार पुकारला.

मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, या प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे (SIT) निष्पक्ष चौकशी करा आणि पीडित कुटुंबाला ५० लाखांचे अर्थसाहाय्य देऊन मुलाला शासकीय सेवेत सामावून घ्या, अशा मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.

कुंभारी येथे २६ सप्टेंबर रोजी घडलेल्या या हत्याकांडात गावगुंडांनी केवळ ज्ञानेश्वर मोरे यांचा जीवच घेतला नाही, तर त्यांच्या मृतदेहाचीही अवहेलना केली. तसेच घटनास्थळी उपस्थित त्यांचा मुलगा यश यालाही बेदम मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. या पार्श्वभूमीवर सकल राजपूत समाजाच्या शिष्टमंडळाने आज आक्रमक पवित्रा घेत, या प्रकरणात कोणत्याही आरोपीची गय करू नका, अशी ठाम भूमिका घेतली.

प्रशासनासमोर मांडलेल्या प्रमुख मागण्या

​फास्ट ट्रॅक कोर्ट आणि फाशी : खटला जलदगती न्यायालयात चालवून नराधम आरोपींना थेट फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी.

‘एसआयटी’ आणि DySP दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत तपास : संपूर्ण तपासावर उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे थेट नियंत्रण असावे आणि कटाचा पर्दाफाश करण्यासाठी SIT गठीत करावी.

​कॉल डिटेल्स अन् डिजिटल पुरावे : घटनेच्या आधीपासून आरोपींच्या अटकेपर्यंतचे CDR, IPDR, मोबाईल लोकेशन आणि आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी करून पडद्यामागील मुख्य सूत्रधारांना बेड्या ठोकाव्यात.

​कुटुंबाला ५० लाख अन् शासकीय नोकरी : मृत ज्ञानेश्वर मोरे हे घरातील एकमेव कमावते व्यक्ती असल्याने त्यांच्या कुटुंबाला तात्काळ ५० लाखांची आर्थिक मदत आणि मुलाला शासकीय नोकरी द्यावी.

​कुटुंबाला २४ तास पोलीस संरक्षण : आरोपी आडदांड आणि खुनशी प्रवृत्तीचे असल्याने साक्षीदार व मोरे यांच्या कुटुंबीयांना तत्काळ पोलीस बंदोबस्त पुरवावा.

या निवेदनाच्या प्रती गृहमंत्री, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठवण्यात आल्या आहेत. वेळीच कठोर पावले न उचलल्यास आणि आरोपींवर वचक निर्माण न केल्यास तीव्र लोकशाही मार्गाने लढा उभारण्याचा इशारा यावेळी समाजबांधवांनी दिला.

या शिष्टमंडळात रवींद्रजी महाले महाराज, किरण राजपूत, प्रवीणसिंग पाटील, विठ्ठलसिंग मोरे, संग्रामसिंह सूर्यवंशी, नारायण पाटील यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT