जळगाव : नेरी बुद्रुक येथील एका शेतकऱ्याकडून जमिनीच्या मोजणीसाठी लागणाऱ्या उताऱ्यांच्या सत्यप्रती देण्यासाठी अवघ्या २०० रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी भूकरमापक भगवान रोहीदास गायकवाड (वय ५१, रा. लहुलिला नगर, भुसावळ) याला रंगेहात बेड्या ठोकल्या. गायकवाड हा जामनेर येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत होता.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी ही कारवा केली. गायकवाड याच्यावर यापूर्वी २०१२ मध्येही भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा दाखल असून, त्याच्यावर एसीबीने त्याला दुसऱ्यांदा अटक केली आहे.
जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक येथील ६५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला आपल्या शेतीची मोजणी करायची होती. त्यासाठी आवश्यक असणारे ‘स्कीम पत्रक’ व ‘टिपण उतारा’ मिळवण्यासाठी त्यांनी २ सप्टेंबर २०२६ रोजी भूमी अभिलेख कार्यालयात रीतसर अर्ज दाखल केला होता. मात्र, संबंधित कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती देण्यासाठी भूकरमापक भगवान गायकवाड याने शेतकऱ्याकडे ७०० रुपयांची थेट मागणी केली. वृद्ध शेतकऱ्याने लाच देण्यास नकार देत ७ सप्टेंबर रोजी जळगाव एसीबीकडे धाव घेऊन लेखी तक्रार नोंदवली.
तक्रारीनंतर ८ सप्टेंबर रोजी एसीबी पथकाने पंचांच्या उपस्थितीत जामनेर कार्यालयात पडताळणी केली. यावेळी गायकवाडने तडजोडीअंती २०० रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्याचे कबूल केले. त्यानंतर पथकाने तातडीने सापळा रचला. कार्यालयातच तक्रारदाराकडून २०० रुपयांची लाच स्वतः स्वीकारताना पथकाने त्याला रंगेहात पकडले. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे, श्रीमती कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगावचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, हेड कॉन्स्टेबल बाळू मराठे, कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर व सचिन चाटे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.