

जळगाव/अडावद : सातपुडा परिसरातील जंगलात सुरू असलेल्या गांजाच्या अवैध लागवडीचा अडावद पोलिसांनी मंगळवारी (दि. ८) पर्दाफाश केला. देवझिरी-देवगड शिवारातील एका शेतात छापा टाकून पोलिसांनी गांजाची तब्बल १७५ झाडे मुळासकट उपटून जप्त केली. या प्रकरणी मध्य प्रदेशातील एका संशयिताविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अडावद पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत देवझिरी-देवगड परिसरातील एका शेतात गांजाची छुप्या पद्धतीने लागवड करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तत्काळ संबंधित शेतात छापा टाकला. पंचांसमक्ष करण्यात आलेल्या झडतीदरम्यान शेतात गांजाची लहान-मोठी झाडे आढळून आली.
पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचनामा केला. त्यानंतर शेतातील गांजाची १७५ झाडे मुळासकट उपटून जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या अवैध गांजा लागवडीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
या प्रकरणी देवसिंग रावल्या बारेला (रा. सिंदखेडी, ता. वरला, जि. बडवानी, मध्य प्रदेश; सध्या रा. देवगड, अनेर नदीकाठ, ता. चोपडा, जि. जळगाव) याच्याविरुद्ध अडावद पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
ही कारवाई जळगावचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
अडावद पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि प्रशांत कंडारे, ग्रेड पोउपनि जितेंद्र सोनवणे, सफौ नासिर तडवी, पोलिस अंमलदार संजय धनगर, विनोद धनगर, शेषराव तोरे, भारत नाईक, किरण शिरसाठ, भूषण चव्हाण आणि महिला पोलिस अंमलदार दिव्या मराठे यांनी कारवाईत सहभाग घेतला.