टोळक्याकडून तरुणाचा खून 
जळगाव

Jalgaon Crime : वाहनाचा लाईट डोळ्यावर पडल्यावरून राडा; टोळक्याकडून तरुणाचा खून, दुसरा गंभीर

एमआयडीसी हद्दीतील थरार : महिलेच्या कारणावरून ठिणगी पडल्याचीही चर्चा

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ वादातून रक्ताचा सडा पडला असून, टोळक्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात किरण विठ्ठल पाटील (वय ४४) या तरूणाचा जागीच मृत्यू झाला तर किशोर छगन पाटील हे गंभीर जखमी झाले. वाहनाचा लाईट डोळ्यावर चमकल्याच्या क्षुल्लक कारणावरून आणि महिलेच्या मुद्द्यावरून हा वाद उफाळून आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आली आहे. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी परिसरामध्ये संशयित तरुण आणि पीडितांमध्ये वाद सुरू झाला. वाहनाचा प्रखर लाईट तोंडावर पडल्याचा आणि एका महिलेशी संबंधित जुन्या कारणाचा संदर्भ या वादाला असल्याचे समजते. वादाचे रूपांतर पाहता पाहता तुंबळ हाणामारीत झाले. संशयित तरुणांनी अत्यंत आक्रमक होत किरण पाटील आणि किशोर पाटील यांच्यावर हल्ला चढवला. हा हल्ला इतका जीवघेणा होता की, किरण विठ्ठल पाटील यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला, तर किशोर पाटील हे गंभीर जखमी झाले. जखमी किशोर पाटील यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

​१९ ते २० वयोगटातील तरुणांचा थरार

या हल्ल्यात सहभागी असलेले संशयित तरुण अवघ्या १९ ते २० वर्षे वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. क्षुल्लक वादातून थेट खुनापर्यंत मजल मारणाऱ्या या तरुणांच्या कृत्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनेचे वृत्त समजताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

​घटनेमागचे मूळ कारण, वाद नेमका कसा पेटला आणि या हल्ल्यात आणखी कोणाचा हात आहे का? याचा कसून शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. संशयितांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून, पंचनाम्याची कारवाई उशिरापर्यंत सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT