Miraj Crime : गुंडेवाडीमध्ये तरुणाचा खून

चाकूने वार; कारण अस्पष्ट; हल्लेखोरांचा शोध सुरू
Miraj Crime News
गुंडेवाडीमध्ये तरुणाचा खून
Published on: 
Updated on: 

मिरज : गुंडेवाडी (ता. मिरज) येथे चाकूने सपासप वार करून तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. सुनील तानाजी खांडेकर (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या खुनाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू होते.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील खांडेकर हे सोमवारी सायंकाळी आपल्या शेतात गेला होते. यादरम्यान अज्ञात हल्लेखोरही त्याच ठिकाणी पोहोचले. तिथे सुनील आणि हल्लेखोरांमध्ये बाचाबाची व वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यावेळी हल्लेखोरांनी सुनील यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन सुनील रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळल्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच त्याचे मित्र व नातेवाईकांनी तातडीने शेतात धाव घेतली. त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा केला. सुनील यांचा खून नेमका कोणी व कोणत्या कारणातून केला, हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. या प्रकरणातील पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी मिरज ग्रामीण पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

पोटातच अडकला चाकू

सुनील खांडेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करताना हल्लेखोराने त्यांच्या पोटात चाकू खुपसला व तो तसाच ठेवून पलायन केले. सुनील यांना गंभीर जखमी अवस्थेत मिरज शासकीय रुग्णालयात आणले असता, त्यांच्या पोटामध्ये तो चाकू तसाच अडकलेला होता. पोटात खोलवर आणि वर्मी घाव बसल्यामुळे रक्तस्राव होऊन त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news