Yawal Tribal Staff Protest  Pudahri
जळगाव

Tribal Staff Protest | यावलमध्ये आदिवासी विकास कर्मचाऱ्यांचा एल्गार; अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन

आरोपी ठेकेदाराच्या अटकेशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार; आश्रमशाळा व कार्यालयांचे कामकाज ठप्प

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Yawal Tribal Staff Protest

जळगाव : यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी झालेल्या कथित अपमानास्पद आणि अरेरावीच्या वागणुकीच्या निषेधार्थ आदिवासी विकास विभागातील कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. 'आदिवासी विकास कर्मचारी एकता मंच'च्या नेतृत्वाखाली प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व आश्रमशाळा व कार्यालयांमध्ये १०० टक्के कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले असून, आरोपी ठेकेदाराला अटक होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

दोन दिवसांपूर्वी एका ठेकेदाराने आदिवासी विकास प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी कथितपणे अपमानास्पद व उद्धट वर्तन केल्याची घटना घडली होती. या प्रकारामुळे विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, त्याचे पडसाद म्हणून कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाला जळगाव जिल्ह्यातील विविध कर्मचारी व सामाजिक संघटनांनीही पाठिंबा दिला आहे.

आंदोलनस्थळी आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी भेट देत आंदोलकांशी संवाद साधला. संबंधित आरोपीवर तातडीने कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धारबळे यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

दरम्यान, पोलिसांनी संबंधित ठेकेदाराचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले असता तो घरातून फरार झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे आरोपीच्या अटकेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा ठाम इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

या आंदोलनामुळे यावल परिसरातील आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळा व कार्यालयांचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असून, प्रशासनासमोर ही परिस्थिती हाताळण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT