जळगाव: जिल्ह्याची भाग्यरेषा मानल्या जाणाऱ्या वाघूर मोठ्या पाटबंधारे प्रकल्पाच्या पाण्याचा तिढा अखेर सुटला आहे. सरकारने पाणी वापराच्या बहुप्रतीक्षित फेरनियोजनाला हिरवा कंदील दाखवला आहे. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी मंत्रालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लावलेला जोर आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे जलसंपदा विभागाने बुधवारी (दि. १४) थेट शासन निर्णय (जीआर) जारी केला.
या निर्णयामुळे कुऱ्हा पानाचे भागातील कोरडवाहू शेतीला आणि घशाला कोरड पडलेल्या शेंदुर्णी शहराला हक्काचे पाणी मिळणार असून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सावकारेंच्या या पाठपुराव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
‘राखीव’ पाण्याचा कोटा शून्यावर; सिंचनाचा टक्का वाढवला!
वाघूर प्रकल्पाच्या सातव्या सुधारित आराखड्यानुसार प्रकल्पाचा एकूण वार्षिक पाणी वापर ३६३ दलघमी इतकाच मर्यादित ठेवण्यात आला आहे. मात्र, नव्या समीकरणात सिंचनाच्या वाट्यात मोठी वाढ करण्यात आली आहे. पूर्वी सिंचनासाठी २१५.७० दलघमी असलेले पाणी आता थेट २२७.०३० दलघमीवर नेण्यात आले आहे. भविष्यातील वापराच्या नावाखाली अडगळीत पडलेला १३.८०० दलघमीचा स्वतंत्र राखीव कोटा पूर्णपणे संपवून (शून्य करून) ते पाणी प्रत्यक्ष वापरासाठी वळवण्यात आले आहे.
कुऱ्हा पानाचे अन् शेंदुर्णीला मोठा बूस्टर डोस
नव्या फेरनियोजनानुसार कुऱ्हा पानाचे उपसा सिंचन योजना क्रमांक १ व २ साठी तब्बल ११.३३० दलघमी पाण्याची अधिकृत तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. दुसरीकडे शेंदुर्णी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी २.४७ दलघमी पाणी मंजूर करण्यात आले आहे. या फेरबदलाला एकात्मिक जलआराखड्यात तातडीने स्थान देण्याचे थेट आदेशच शासनाने यंत्रणेला दिले आहेत.
वाघूरचे नवे ‘जल-गणित’ (आकडे दलघमीमध्ये):
एकूण वार्षिक पाणीवापर : ३६३ दलघमी (कायम)
शेती/सिंचनासाठी : २२७.०३० दलघमी (वाढ)
पिण्याच्या पाण्यासाठी : ६३.२६० दलघमी
औद्योगिक वापर : ९.७८० दलघमी
बाष्पीभवन तोटा : ६२.९३० दलघमी
भविष्यासाठी राखीव कोटा : ०.०० दलघमी