

जळगाव: शहरात सर्वत्र साचलेले कचऱ्याचे ढिग, पसरलेली दुर्गंधी आणि त्यामुळे बळावणारे डेंग्यू-मलेरियासारखे साथीचे आजार यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार निवेदने देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याने, पक्षाच्या वतीने आज, बुधवारी ३० सप्टेंबर रोजी जळगाव शहर महानगरपालिका येथे 'कचरा फेको' आंदोलन करण्यात आले.
शहरातील गल्लीबोळात आणि मुख्य रस्त्यांवर गेल्या अनेक दिवसांपासून कचरा उचलला जात नसून जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून डेंग्यू आणि मलेरियासारख्या जीवघेण्या आजारांची साथ वेगाने पसरत आहे.
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी १५ दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देऊन कचरा उचलण्याची व साफसफाईची तातडीने मागणी करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून गांभीर्याने दखल न घेतल्याने हे पाऊल उचलण्यात आले.
या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाल्याची माहिती जिल्हा कार्यालय सरचिटणीस सुनिल माळी यांनी दिली.