Jalgaon Vidhan Parishad Election  Pudhari
जळगाव

Jalgaon Politics | जळगावात 'महायुती'तच रणकंदन? पालकमंत्र्यांच्या लेकाचे 'दंड' तर भाजपचा 'अमोल' पेच!

'मिनी मंत्रालया'आधीच विधान परिषदेचा बिगुल; बॅनरबाजीने वातावरण तापले, भाजप बालेकिल्ला राखणार की सोडणार?

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Vidhan Parishad Election

जळगाव : जिल्ह्यात 'मिनी मंत्रालय' असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची अद्याप चिन्हे नसली, तरी विधान परिषदेच्या (स्थानिक स्वराज्य संस्था) निवडणुकीचे वातावरण मात्र आतापासूनच 'ओव्हरहीट' झाले आहे. आजवर या जागेवर भाजपाने आपला उमेदवार दिला आणि शिवसेनेने त्याला रसद पुरवली, असा इतिहास आहे. मात्र, यंदा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रतापराव पाटील यांनी मैदानात उतरण्याची तयारी दर्शवल्याने, युतीतच 'सामना' होणार की भाजपा माघार घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

भाजपाच्या गोटात इच्छुकांची मांदियाळी; 'अमोल' फॅक्टर ठरणार गेमचेंजर?

भाजपाकडून यंदा उमेदवारीसाठी मोठी चुरस आहे. यात प्रामुख्याने अमोल शिंदे यांच्या नावाची चर्चा सर्वाधिक आहे. नगरपालिका निवडणुकीत चोपड्याचे आमदार किशोर पाटील यांना नगराध्यक्ष निवडीत थेट भिडत देत अमोल शिंदे यांनी आपले वजन सिद्ध केले होते. त्यामुळे तरुण चेहरा म्हणून त्यांच्या नावाचा आग्रह धरला जात आहे.

दुसरीकडे, महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यानंतर संकटमोचक गिरीश महाजन यांनी मुंबईत मोठा मोर्चा काढला होता. याच पार्श्वभूमीवर, जळगाव लोकसभा मतदारसंघात दोन महिला खासदार असूनही विधानसभेत मात्र पुरुषांचीच मक्तेदारी आहे. ही कसर भरून काढण्यासाठी डॉ. केतकी पाटील यांना विधान परिषदेची संधी देऊन भाजपा 'महिला कार्ड' खेळणार का? अशीही चर्चा रंगली आहे. तसेच जुने जाणते नंदू महाजन, नंदू अडवाणी आणि विद्यमान चंदूलाल पटेल यांना पुन्हा संधी मिळणार का, यावरही तर्कवितर्क लढवले जात आहेत.

शिवसेनेचे 'प्रताप'पर्व सुरू होणार?

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रतापराव पाटील यांनी या निवडणुकीसाठी थेट शड्डू ठोकल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. "जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे," असा दावा करत शिंदे गटाने या जागेवर हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. जर शिवसेनेने हा दावा कायम ठेवला, तर भाजपा आपल्या हक्काची जागा मित्रपक्षासाठी सोडेल का? हा सर्वात मोठा यक्षप्रश्न आहे.

आकडेवारीचा पेच: कोण ठरणार किंगमेकर?

जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडल्या असल्या तरी, ६४७ संभाव्य मतदारांपैकी ५६४ मतदार सध्या मतदानासाठी सज्ज आहेत. यात महायुतीचे पारडे जड असले, तरी अंतर्गत फाटाफूट झाल्यास गणित बिघडू शकते.

पक्षांनुसार सध्याची ताकद:

भाजपा: २२५

शिंदे सेना: १४६

राष्ट्रवादी (अजित पवार गट): १७

एकूण महायुती: ३८९

विरोधी आणि इतर:

राष्ट्रवादी (शरद पवार गट): ४१

उद्धव सेना: ११

काँग्रेस: २२

एमआयएम: ३

अपक्ष: ४४

विविध आघाड्या: ५५ (एकूण ७४ मतदार चिन्हावर, तर १०२ मतदार आघाड्यांचे आहेत)

अपक्षांची भूमिका ठरणार निर्णायक!

जर भाजपा आणि शिवसेना समोरासमोर आली, तर महायुतीच्या ३८९ मतांची विभागणी अटळ आहे. अशा स्थितीत ४४ अपक्ष आणि ५५ विविध आघाड्यांच्या मतदारांची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरेल. शरद पवार गट आणि उद्धव सेना कोणाला छुपी मदत करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. जळगावच्या या 'हाय-व्होल्टेज' लढतीत 'कमळ' फुलणार की 'धनुष्यबाण' सरस ठरणार, याचा फैसला आता वरिष्ठ पातळीवरील वाटाघाटींवरच अवलंबून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT