Jalgaon Theft Incident Pudhari
जळगाव

Jalgaon Burglaries | जळगावात घरफोड्यांची मालिका सुरूच! बंद घरे हेरून चोरट्यांचा धुमाकूळ; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

चैतन्य नगर व चोपड्यातील आदर्श नगरात दोन घरफोड्या; पोलिसांसमोर चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Theft Incident

जळगाव : जिल्ह्यात घरफोड्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, बंद घरे हेरून चोरी करणाऱ्या टोळीने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. जळगाव शहरातील चैतन्य नगर आणि चोपडा शहरातील आदर्श नगर येथे झालेल्या दोन स्वतंत्र घरफोड्यांमध्ये अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. या दोन्ही प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

जळगावात कंत्राटदाराच्या घरातून रोकड व दागिने लंपास

जळगाव शहरातील चैतन्य नगर येथे राहणारे कंत्राटदार धनराज उत्तम गोपाल (वय ४३) हे २९ जुलै रोजी सायंकाळी पत्नी कविता यांच्यासह घराला कुलूप लावून मायादेवी नगर परिसरात गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला.

घरातील टीव्ही काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली १ लाख ५२ हजार रुपयांची रोकड तसेच १० हजार रुपये किमतीचे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण १ लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी ३० जुलै रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख तपास करीत आहेत.

चोपड्यात नऊ दिवस बंद असलेल्या घरावर डल्ला

दुसरी घटना चोपडा शहरातील आदर्श नगर येथे घडली. गॅरेज व्यावसायिक बिरजू ओंकार सूर्यवंशी (वय ३२) हे २१ ते ३० जुलैदरम्यान घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याची खात्री करून अज्ञात चोरट्याने कडी-कोंडा तोडत बेडरूममध्ये प्रवेश केला.

बेडरूममधील धान्याच्या कोठीत लपवून ठेवलेले १ लाख ८४ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले. यात ३ ग्रॅमचे मंगळसूत्र (१३,५०० रुपये), २० ग्रॅमची सोन्याची मंगलपोत (९० हजार रुपये), १४ ग्रॅमचे कानातील झुमके व काप (६३ हजार रुपये) तसेच ४ ग्रॅमची सोन्याची अंगठी (१८ हजार रुपये) यांचा समावेश आहे.

३० जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

एकाच दिवशी जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या घरफोड्या उघडकीस आल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही घटनांतील आरोपी अद्याप फरार असून, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. तसेच संशयितांची माहिती गोळा करून चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बंद घरे दीर्घकाळ कुलूपबंद ठेवताना नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT