Jalgaon Criminals Tadipar Order
जळगाव : आगामी सण-उत्सव तसेच २०२६ मध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरात दहशत निर्माण करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना पुढील एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
उपविभागीय दंडाधिकारी (जळगाव विभाग) यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ५६ (१) अंतर्गत २१ मे रोजी हे आदेश जारी केले.
तडीपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राम उर्फ सोनू भगवान सरवन (रा. गुरुनानक नगर, जळगाव) याचा समावेश असून तो शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. त्याच्यावर घरफोडी, दरोडा, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, मारामारी यांसारखे १३ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही तडीपारीचा आदेश असताना त्याने आदेशाचे उल्लंघन केल्याची नोंद आहे. तसेच एका श्वानावर अमानुष अत्याचार केल्याचा गंभीर प्रकारही त्याच्या विरोधात समोर आला होता.
दुसरा आरोपी विशाल मुरलीधर दाभाडे (रा. रामेश्वर कॉलनी, चांगापाचा मंदिराजवळ, जळगाव) हा एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. परिसरात घातक शस्त्रांचा धाक दाखवत नागरिकांना धमकावणे, घरफोडी, दुकाने फोडणे आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणे, यामुळे त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारी होत्या. प्रतिबंधात्मक कारवायांनंतरही त्याच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने अखेर तडीपारीची कारवाई करण्यात आली.
दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, दोन्ही आरोपींना आदेश प्राप्त झाल्यानंतर दोन दिवसांच्या आत जळगाव जिल्ह्याबाहेर जाणे बंधनकारक आहे. पुढील एक वर्ष त्यांना जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही. अत्यावश्यक कारणासाठी जिल्ह्यात येण्याची गरज भासल्यास सक्षम अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे.
तसेच तडीपारीच्या कालावधीत ज्या ठिकाणी वास्तव्य करतील, त्या भागातील स्थानिक पोलीस ठाण्यात दरमहा हजेरी लावून पत्ता नोंदवणेही त्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
“शहरातील शांतता भंग करणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. निवडणुका आणि सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असून नागरिकांनी निर्भयपणे राहावे,” असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले.