जळगाव : शहरातील अजिंठा चौकाजवळील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात सोमवारी (दि.२४) संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भुसावळ येथील २१ वर्षीय शासकीय आयटीआय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विरुद्ध दिशेने अचानक समोर आलेल्या बोलेरो वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट टँकरखाली गेली आणि हा प्राणघातक अपघात घडला.
या दुर्घटनेत वरुण विजय सुरवाडे (वय २१, रा. भुसावळ) याचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा एक साथीदार गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय आयटीआयचे तिघे विद्यार्थी वरुण सुरवाडे, पवन अनिल अडकमोल आणि नीरज रवींद्र कोचुरे कॉलेज सुटल्यानंतर एकाच दुचाकीवरून भुसावळच्या दिशेने निघाले होते. ट्रान्सपोर्ट नगरजवळ विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या बोलेरोमुळे चालक घाबरला आणि दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर दुचाकी थेट समोरून येणाऱ्या टँकरच्या चाकाखाली गेली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी वरुण सुरवाडे याला मृत घोषित केले. अपघातात पवन अनिल अडकमोल गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. नीरज रवींद्र कोचुरे याच्यावर किरकोळ दुखापतींवर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती समजताच रुग्णालयात नातेवाईक आणि मित्रांनी मोठी गर्दी केली आणि एकच आक्रोश उसळला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारी उशिरापर्यंत सुरू होती.