Sand Mafia Penalty Jalgaon
जळगाव : जिल्ह्यात ‘पिवळ्या सोन्या’ची म्हणजेच वाळूची अवैध लूट थांबण्याचे नाव घेत नसल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. १ एप्रिल २०२५ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत महसूल विभागाने केलेल्या कारवाईचा अहवाल प्रसिद्ध झाला असून, या नऊ महिन्यांत जिल्हाभरात वाळू चोरीच्या ४९४ प्रकरणांमध्ये तब्बल ६ कोटी ५८ लाख १ हजार ३७६ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. मात्र, यापैकी केवळ ४ कोटी २६ लाख रुपयांचीच प्रत्यक्ष वसुली झाल्याने प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
विशेष म्हणजे, वाळू तस्करांवर कारवाई करताना नऊ ठिकाणी महसूल व पोलिस अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, वाळूमाफियांची मुजोरी थेट प्रशासनाच्या जीवावर उठत असल्याचे गंभीर चित्र आहे.
या अहवालातून जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांच्या मतदारसंघांतील वाळू तस्करीचे वास्तवही उघड झाले आहे.
जामनेर (मंत्री गिरीश महाजन यांचा तालुका)
जामनेर तालुक्यात २९ लाख १४ हजार ८५ रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, यापैकी २० लाख ७२ हजार ५१५ रुपयांचीच वसुली झाली आहे. अद्याप ८ लाख ४१ हजार ६०० रुपयांची वसुली बाकी आहे. अकरा वाहने जप्त करण्यात आली असली तरी एकही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही किंवा कोणतीही अटक झालेली नाही, हे विशेष ठरते.
धरणगाव (पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा तालुका)
धरणगाव तालुक्यात २३ प्रकरणांत १९ लाख ५८ हजार ८३५ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, त्यापैकी १८ लाख ५८ हजार ८३५ रुपये वसूल करण्यात प्रशासनाला यश आले आहे. केवळ १ लाख रुपयांची वसुली बाकी आहे. गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणात एक गुन्हा दाखल असून, २३ वाहने जप्त करण्यात आली आहेत. मात्र, कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
मुक्ताईनगर (केंद्रीय मंत्र्यांचा मतदारसंघ)
मुक्ताईनगर तालुक्यात १८ प्रकरणांत ३९ लाख ८६ हजार १४० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. यापैकी १६ लाख ९० हजार ७६० रुपयांची वसुली अद्याप बाकी आहे. येथे गौण खनिज प्रकरणात तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून, १८ वाहने जप्त करण्यात आली आहेत. मात्र, एकही आरोपी अटक झालेला नाही.
अमळनेर (अजित पवार गटाचा प्रभाव असलेला तालुका)
अमळनेर तालुक्यात सर्वाधिक ५१ प्रकरणे उघडकीस आली असून, ४६ लाख ६४ हजार ५३९ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यापैकी ३५ लाख २ हजार ९९१ रुपयांची वसुली करण्यात आली असून, ११ लाख ६१ हजार ५४८ रुपये अजून वसूल करणे बाकी आहे. येथे दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून, ५१ वाहने जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, या तालुक्यात दोन वेळा अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्याची नोंद आहे.