

Railway Theft Case
जळगाव : धावत्या रेल्वेमध्ये प्रवाशांच्या सामानावर डल्ला मारून रेल्वे प्रशासन व पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. समीर शेख फिरोज उर्फ ‘गोल्डन’ (रा. फातेमा नगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याचा साथीदार सोनू जयसिंग बागडे (रा. जाखनी नगर) याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. जळगाव ते भुसावळ दरम्यान झेलम एक्सप्रेसमध्ये घडलेल्या चोरीचा गुन्हा अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी अयोध्या येथील रहिवासी आनंद मोर्या हे झेलम एक्सप्रेसने प्रवास करत होते. जळगाव–भुसावळ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची १ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने असलेली बॅग लंपास केली. याप्रकरणी आनंद मोर्या यांनी इटारसी रेल्वे पोलिस ठाण्यात ‘शून्य’ क्रमांकाने तक्रार दाखल केली होती. पुढे हा गुन्हा तपासासाठी भुसावळ रेल्वे पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.
रेल्वेमधील वाढत्या चोरीच्या घटनांचा आढावा घेत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी पथकाला सतर्क केले होते. दरम्यान, या चोरीत जळगावातील रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर शेख फिरोज उर्फ गोल्डन व त्याचा साथीदार सोनू बागडे यांचा सहभाग असल्याची खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार एलसीबी पथकाने फातेमा नगर परिसरात सापळा रचून गोल्डनला ताब्यात घेतले. पोलिसी चौकशीत त्याने आपल्या साथीदारासह चोरी केल्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस अंमलदार अतुल बंजारी, अकरम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, किशोर पाटील व रविंद्र कापडणे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कारवाईसाठी भुसावळ रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, फरार आरोपी सोनू बागडे याचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे धावत्या रेल्वेमधील चोरी करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.