जळगाव : जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे महसूल विभागाच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, वाळू गटांच्या लिलावातून शासनाला सुमारे ४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला असताना, अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवरील कारवाईत ९ कोटी २९ लाख ५ हजार ८४१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यापैकी ६ कोटी ६० लाख ९८ हजार ३९ रुपये वसूल झाले असून २ कोटी ६७ लाख ७० हजार ४०६ रुपये अद्याप वसूल होणे बाकी आहेत. ही रक्कम एक एप्रिल 2025 31 मार्च 2026 या कालावधीमध्ये करण्यात आलेल्या कारवाईतून महसूल रक्कम शासनाला मिळालेली आहे .
जिल्ह्यातील १४ वाळू गटांपैकी ११ गटांचा लिलाव झाला. त्यातून शासनाला सुमारे ४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. मात्र प्रत्यक्षात १० गटांमधूनच वाळू उपसा सुरू झाला. दोन गटांच्या ठेकेदारांनी रक्कम भरली नाही. चोरगाव येथील गटाला ग्रामस्थांच्या विरोधामुळे वाळू उपसा होऊ शकला नाही, तर जामनेर तालुक्यातील टाकरखेडा गटाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
दुसरीकडे, गिरणा नदीच्या वाळूला जिल्ह्यासह बाहेरील भागात मोठी मागणी असल्याने मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन आणि चोरटी वाहतूक सुरू असल्याचे कारवाईतून समोर आले आहे. महसूल विभागाने ६७५ अनधिकृत वाहतूक व उत्खनन प्रकरणांवर कारवाई केली. यामध्ये ६७ गुन्हे दाखल करण्यात आले असून ६२४ वाहने जप्त करण्यात आली आहेत. कारवाईदरम्यान शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या ८ घटना घडल्या. तसेच अवैध उत्खननासाठी वापरण्यात आलेली ७ वाहने व यंत्रसामग्री जप्त करण्यात आली.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वाळू चोरांनी धुमाकूळ घातला आहे. जळगाव तालुक्यात सर्वाधिक दंड आकारण्यात आला असून भडगाव, एरंडोल आणि चोपड्यात महसूल कर्मचाऱ्यांवर थेट हल्ले चढवण्यापर्यंत माफियांची हिंमत वाढली आहे. वाळू गटांच्या लिलावातून मिळालेल्या महसुलापेक्षा अवैध वाळू उत्खननावरील दंडाची रक्कम दुप्पटीहून अधिक असल्याने जिल्ह्यात अवैध वाळू व्यवसायाचे जाळे किती व्यापक आहे, हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. तसेच अद्याप २.६७ कोटी रुपयांहून अधिक दंडाची वसुली प्रलंबित असल्याने महसूल विभागासमोर वसुलीचे मोठे आव्हान कायम आहे.
जळगाव तालुका : सर्वाधिक १.७२ कोटी रुपयांचा दंड; १३७ प्रकरणे, ११ गुन्हे, १३७ वाहने जप्त, अधिकारी-कर्मचाऱ्यांवर २ हल्ले.
भडगाव : ८४ प्रकरणे, १.३४ कोटी रुपयांचा दंड, ३ हल्ले, ३ वाहने जप्त.
पाचोरा : ६९ प्रकरणे, १.०३ कोटी रुपयांचा दंड, ६९ वाहने जप्त.
एरंडोल : ५५ प्रकरणे, ९२.९५ लाख रुपयांचा दंड, सर्वाधिक २२ गुन्हे दाखल.
चाळीसगाव : ८६ प्रकरणे, ६०.१३ लाख रुपयांचा दंड, ८६ वाहने जप्त.
अमळनेर : ५९ प्रकरणे, ५५.४१ लाख रुपयांचा दंड, २ गुन्हे, १ हल्ला.
पारोळा : ८ प्रकरणांमधील १०० टक्के दंड वसुली.
धरणगाव: ३१ प्रकरणे ३९.६७ लाख रुपयांचा दंड, ८ गुन्हे २१ वाहने जप्त
जामनेर: १४ प्रकरणे ३७.४५ लाख रुपयाचा दंड, १४ वाहने जप्त
भुसावळ: १८ प्रकरणे ४२.१९ रुपयांचा दंड १ गुन्हा १८ वाहने जप्त
बोदवड: २ प्रकरणे,४.२६ लाख दंड दोन गुन्हे एक वाहन जप्त
मुक्ताईनगर: २८ प्रकरणे, ५०.३६ लाख रुपयांचा दंड ३ गुन्हे २२ वाहने जप्त,
यावल: २८ प्रकरणे,४४.१६ लाख रुपयांचा दंड २ गुन्हे २८ वाहने जप्त
रावेर :२१ प्रकरणे २८.४२ लाख रुपयांचा दंड २१ वाहने जप्त
अमळनेर: ५९ प्रकरणे ५५.४१ लाख रुपयांचा दंड २ गुन्हे ६० वाहने जप्त
चोपडा: ३५ प्रकरणे ५२.११ लाख रुपयांचा दंड ६ गुन्हे २७ वाहने जप्त
एरंडोल: ५५ प्रकरणे ९२.९५ लाख रुपयांचा दंड २२ गुन्हे १८ वाहने जप्त