जळगाव : लग्न घरातील आनंदावर काळाने घाला घातला असून, नवरीला घेऊन जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा धरणगाव तालुक्यातील वराड सिम येथे भीषण अपघात झाला. गाडीचे पुढचे चाक अचानक निखळल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन समोरून येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकले. या भीषण धडकेत नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, 6 जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये एका लहान बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात येथील व्यापी येथून अकोल्याच्या दिशेने नवरीला परत घेऊन जाणाऱ्या भाविकांचे क्रुझर वाहन (क्रमांक स्पष्ट नाही) धरणगाव परिसरातील वराड सिम फाट्याजवळून जात होते. अचानक वाहनाचे पुढचे चाक निखळले आणि गाडी थेट समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळून पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, वाहनाचा चक्काचूर झाला असून तीन प्रवाशांनी घटनास्थळीच प्राण सोडले. पूजा रवी वाघळकर (नववधू), दत्तू भागवत, जगदीश वाघळकर अशी मृतांची नावे आहेत.
रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी शिवाजी पाटील आणि ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू असून जिल्हा रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
"अपघातातील जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिघांचा मृत्यू झाला असून, एका लहान बालकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. वैद्यकीय पथक जखमींवर योग्य उपचार करत आहे."— डॉ. इमरान पठाण (उप वैद्यकीय अधीक्षक, जळगाव)