Jalgaon Politics 
जळगाव

Jalgaon Politics | 'सावद्यात आमचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न झाला!'; महायुतीच्या बैठकीत माजी नगराध्यक्षांनी काढले वाभाडे

नामदार गिरीश महाजनांकडून मनधरणी; 'वरतून कोटा ठरलाय'

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये 'ऑल इज वेल' नसल्याचे चित्र आज चव्हाट्यावर आले आहे. युतीधर्म पाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यालयात बोलावण्यात आलेल्या बैठकीत अंतर्गत धुसफूस आणि तीव्र नाराजी उघड झाली.

सावदा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी भर बैठकीत भाजप-सेनेवर तोफ डागत, "स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न झाला," असा थेट आरोप केला. यावर संकटमोचक नामदार गिरीश महाजन यांनी तातडीने डॅमेज कंट्रोल करत, "गेल्या काळात जे झालं ते विसरा, पुढच्या काळात निधी आणि कोटा १०० टक्के ठरलेला आहे," असे म्हणत नेत्यांची मनधरणी केली.

'आम्ही काही अमिषापोटी अर्ज भरलेला नाही'; वानखेडेंचा संताप

बैठकीत सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांच्यातील खदखद बाहेर आली. आपल्या भावनांना वाट करून देताना ते आक्रमकपणे म्हणाले; "आता विधान परिषदेला युतीधर्माची आठवण होतेय, मग नगरपालिकेच्या निवडणुकीत हा युतीधर्म कुठे गेला होता? आम्ही आमच्या अस्तित्वासाठी नगरपालिकेत लढलो, कारण जनतेची कामे आम्ही केली आहेत. मात्र, त्या निवडणुकीत आमचे अस्तित्वच नष्ट करण्याचा डाव रचला गेला. भाजप आणि सेना एकत्र येऊन आमच्या विरोधात लढले आणि अजित पवार गटाला एकटं पाडलं."

वानखेडे एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी स्थानिक समीकरणांवर बोट ठेवत सुनावले की, "रावेर मतदारसंघात भाजपचा खासदार आहे, मुक्ताईनगरमध्ये सेनेचा आमदार आहे, मग एखाद्या ठिकाणी राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष राहू दिला असता तर काय बिघडले असते? आम्ही आमचे अर्ज कोणत्याही अमिषापोटी दाखल केलेले नाहीत. आमच्यावर झालेला अन्याय दूर व्हावा, एवढीच आमची मागणी आहे."

'जिल्हा परिषदेवर शंभर टक्के ताबा मिळवू' : गिरीश महाजन

राजेश वानखेडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे बैठकीत काही काळ शांतता पसरली होती. मात्र, गिरीश महाजन यांनी परिस्थिती सांभाळत अत्यंत चतुरपणे उत्तर दिले. ते म्हणाले, "वेगवेगळ्या पक्षांना एकत्र आणताना खूप मेहनत करावी लागते. गेल्या काळात जे काही घडलं, ते आता बाजूला ठेवा. आपण आता महायुतीत आहोत. राज्याच्या पुढच्या काळात येणारा 'डीपीसी'चा निधी आणि १०० टक्के कोटा वाटप कसं करायचं, हे वरतून आधीच ठरलेलं आहे. पुढच्या काळात सर्वकाही ठरल्याप्रमाणेच होईल."

"निधीचे रडणे फक्त एकाच ठिकाणचे नाही, तर सर्वदूर सारखीच परिस्थिती आहे," अशी कबुली देत महाजन यांनी, "आपण सर्वांनी एकत्र बसून कुठे काय समस्या आहेत, त्या सोडवल्या पाहिजेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत जर आपण एकत्र लढलो, तर जळगावात शंभर टक्के जागा जिंकू शकतो," असा विश्वास व्यक्त केला. तसेच, जळगाव हा महायुतीचा बालेकिल्ला असून विधान परिषदेच्या ६०० पैकी ५०० हून अधिक मते आपल्याच पारड्यात पडतील, असा दावाही त्यांनी केला.

बैठकीला दिग्गज नेत्यांची हजेरी

राष्ट्रवादीच्या कार्यालयात झालेल्या या हायव्होल्टेज बैठकीला संकटमोचक नामदार गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, भाजपचे उमेदवार नंदू महाजन, मंत्री अनिल भाईदास पाटील, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष संजय पवार, उमेश नेमाडे, माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वानखेडेंच्या नाराजीनाट्यामुळे महायुतीमधील अंतर्गत दरी मिटवण्यात नेत्यांना किती यश येते, हे आगामी काळच ठरवेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT