Jalgaon news pudhari photo
जळगाव

Jalgaon news: अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले; जळगाव जिल्ह्यात एकाच वेळी धाडी, लाखोंचा मुद्देमाल जप्त

हातभट्टी, जुगार अन् दारूबंदी मोहिमेत पोलिसांचे 'स्ट्राईक फोर्स'; ८३ हून अधिक आरोपींच्या आवळल्या मुसक्या

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon news

जळगाव: जळगाव जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलिसांनी आखलेल्या 'विशेष मोहिमे'ने गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडवून दिली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी एकाच वेळी केलेल्या कारवाईत हातभट्टी, सट्टा-जुगार आणि बेकायदेशीर दारूविक्री करणाऱ्यांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आक्रमक पवित्र्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. यात जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, ही कारवाई पूर्ण नियोजनबद्ध रीतीने संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी करण्यात आली, जेणेकरून गुन्हेगारांना पळून जाण्याची संधी मिळू नये.

कारवाईचा लेखाजोखा

१. हातभट्टी दारू मोहीम:

जिल्ह्यात गावठी दारूच्या अड्ड्यांवर पोलिसांनी मोठा प्रहार केला आहे.

एकूण केसेस: ८५

जप्त/नष्ट मुद्देमाल: २४ लाख ६७ हजार ४८५ रुपये.

एकूण आरोपी: ८३

२. सट्टा आणि जुगार:

गुप्तरित्या चालणाऱ्या सट्टा अड्ड्यांवर धाडी टाकून जुगारींना बेड्या ठोकण्यात आल्या.

एकूण केसेस: ५८

जप्त मुद्देमाल: २ लाख २ हजार १९२ रुपये.

एकूण आरोपी: ६९

३. प्रोहिबिशन (दारूबंदी कायदा उल्लंघन):

बेकायदेशीर वाहतूक आणि मद्यप्राशन करणाऱ्यांविरोधातही दंडुका उगारण्यात आला.

एकूण केसेस: ३८

जप्त मुद्देमाल: १ लाख ४१ हजार ६० रुपये.

एकूण आरोपी: ३९

या मोहिमेच्या यशात अपर पोलीस अधीक्षक (जळगाव) संदीप गावीत, अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव) कविता नेरकर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या विशेष पथकातील अंमलदारांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. जिल्ह्याची शांतता भंग करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अवैध धंदे कोठेही सुरू असतील तर नागरिकांनी न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल.
श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT