

एकूण जप्त माल: २५,१३,५४०/- रुपये
दंड आकारणी: ४,१८,६२९/- रुपये
गंभीर गुन्हे: १०१ दाखल
टवाळखोर: ३३ जणांवर कारवाई
Jalgaon 36 Police Stations Joint Operation
जळगाव : जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारांनी उच्छाद मांडला असतानाच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आपल्या खाकीचा हिसका दाखवला आहे. मंगळवारी जिल्ह्यात राबविलेल्या 'ऑपरेशन ऑल आऊट' मोहिमेत पोलिसांनी गुन्हेगारांची अक्षरश: पळता भुई थोडी केली. जिल्ह्यातील ३६ पोलीस ठाणी आणि ३ वाहतूक शाखांच्या संयुक्त फौजेने एकाच वेळी नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन राबवत २५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला. तर तब्बल १९५ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
आगामी काळ आणि कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि संदीप गावित यांच्या देखरेखीत ही विशेष मोहीम आखली होती. २८ एप्रिल रोजी सकाळी १० ते रात्री ११ वाजेपर्यंत चाललेल्या या धडक कारवाईत पोलिसांनी समाजकंटक आणि अवैध व्यवसायांचे कंबरडे मोडले. जिल्ह्याभरात २१ ठिकाणी नाकाबंदी करून गुन्हेगारांची कसून तपासणी करण्यात आली.
अवैध दारूवर 'सर्जिकल स्ट्राईक':
जिल्ह्यातील १३६ अड्ड्यांवर धाडी टाकून २५ लाख १३ हजार ५४० रुपयांची गावठी व विदेशी दारू जप्त करण्यात आली. जळगाव तालुका आणि यावलमध्ये मोठी कारवाई झाली.
शस्त्रसाठा जप्त:
मुक्ताईनगरमध्ये २९ इंचाची तलवार तर जळगाव तालुक्यातून दोन धारदार चाकू जप्त करून 'आर्म ॲक्ट'खाली गुन्हे दाखल करण्यात आले.
मद्यपींना दणका:
ड्रंक अँड ड्राईव्हच्या २७२ केसेस करून २ लाख ८२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. बुलेटचे सायलेन्सर बदलणाऱ्यांनाही पोलिसांनी चांगलाच 'आवाज' दिला.
मुस्कान मोहीम:
कारवाईच्या धामधुमीत पोलिसांनी माणुसकीही जपली; ३४ हरवलेली मुले आणि महिलांना शोधून त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
आजकाल सोशल मीडियावर आक्षेपार्ह रिल्स बनवून दहशत माजविणाऱ्या ५ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तसेच शाळा-महाविद्यालय परिसरात फिरणाऱ्या ३३ टवाळखोरांना पोलीस स्टाईलने 'प्रसाद' दिला. १०५ हॉटेल आणि लॉजेसची तपासणी करून मानवी तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी सतर्कता दाखवली.
अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या ७७ फरार आरोपींचा शोध घेण्यात आला, त्यापैकी १३ जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले. जिल्ह्यातील शांतता भंग करणाऱ्या १२२ जणांवर नवीन 'बी.एन.एस.एस.' (BNSS) कायद्यानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. हा तर फक्त ट्रेलर असून, यापुढेही अशी कोम्बिंग ऑपरेशन्स अचानक राबविली जातील. शांतता भंग करणाऱ्यांनी आता सुधारून जावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.
— श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, जळगाव