Police Naik Dismissed File Photo
जळगाव

Jalgaon Police | जळगाव पोलीस दलात खळबळ: शनिपेठेतील लाचखोरी प्रकरणी पोलीस नाईक बडतर्फ; निरीक्षकांची बदली

अहिरे यांच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक तक्रारी, केवळ निलंबन न करता थेट बडतर्फीची कठोर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Shani Peth Bribery Investigation

जळगाव : जळगाव पोलीस दलातील लाचखोरी प्रकरणावर कठोर कारवाई करत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे यांना सेवेतून थेट बडतर्फ केले आहे. तसेच या प्रकरणात निष्काळजीपणा आढळल्याने पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी पोलीस नाईक अहिरे यांनी एक लाख रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून शनिपेठ पोलीस ठाण्याच्या आवारातच त्यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या घटनेमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्याची भावना व्यक्त होत होती.

तपासादरम्यान अहिरे यांच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक तक्रारी असल्याचे समोर आले. त्यामुळे केवळ निलंबन न करता थेट बडतर्फीची कठोर कारवाई करण्यात आली.

दरम्यान, या प्रकरणात वरिष्ठ म्हणून योग्य देखरेख न ठेवल्याचा ठपका ठेवत पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांचीही तातडीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तक्रार चौकशीची जबाबदारी कनिष्ठ कर्मचाऱ्याकडे सोपवून त्यावर नियंत्रण न ठेवणे हा गंभीर निष्काळजीपणा असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

या कारवाईमुळे जळगाव पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, लाचखोरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT