

जळगाव: शहराच्या मध्यवस्तीत आणि थेट पोलीस दलाच्या नाकाखाली असलेल्या भास्कर मार्केटसमोरील ‘दक्षता’ पेट्रोल पंपावर तब्बल १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा प्रचंड अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्या पंपावर ‘दक्षता’ राखण्याची जबाबदारी होती, तिथेच व्यवस्थापकाने पोलीस दलाला चुना लावल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी व्यवस्थापक वाल्मीक मधुकर वाघ याने स्वतःहून शरणागती पत्करली असून, पोलिसांनी त्याच्या मुलासहित दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
१० महिन्यांपासून लुटालूट सुरूच! मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२५ ते ९ फेब्रुवारी २०२६ या १० महिन्यांच्या कालावधीत हा कोट्यवधींचा घोटाळा पद्धतशीरपणे करण्यात आला. दक्षता पेट्रोल पंपावर दररोज होणारी पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीची रक्कम पंपाच्या अधिकृत बँक खात्यात भरणे बंधनकारक होते. मात्र, वाल्मीक वाघ याने ही शासकीय रक्कम बँकेत जमा न करता स्वतःच्याच खिशात घातली. तब्बल १० महिने हा प्रकार सुरू राहिला आणि ही रक्कम सव्वा कोटींच्या पार गेली.
हा सर्व पैसा वाघ याने खर्च केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांचाच पैसा आणि पोलिसांच्याच डोळ्यादेखत हा व्यवस्थापक डल्ला मारत होता, ही बाब समोर आल्यानंतर पोलीस दलाची मोठी नाचक्की झाली आहे.
आरोपीची थेट एसपींकडून चौकशी
दक्षता पेट्रोल पंपाचे माजी व्यवस्थापक वाल्मीक वाघ याने गुरुवारी दि 9 रोजी स्वतः स्थानिक गुन्हे शाखेत येऊन शरणागती पत्करली. या महाघोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेता, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्वतः स्थानिक गुन्हे शाखेत जाऊन आरोपी वाल्मीक वाघ याची कसून चौकशी केली. मात्र, अपहार केलेली ही प्रचंड रक्कम नक्की कुठे दडवून ठेवली किंवा कोणाकडे दिली, याबाबत त्याने अद्याप मौन बाळगले आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून, त्याचा मुलगा शेखर वाघ (वय ३३) यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार: आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असली तरी पैशांच्या गुंतवणुकीबाबत तो पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे समजते. आता हा 'दक्षता'चा पैसा पुन्हा सरकारी तिजोरीत जमा होणार का, की यामागे आणखी काही मोठे मासे आहेत, याचा तपास एलसीबी करत आहे.