Piped Natural Gas Jalgaon 
जळगाव

Piped Natural Gas Jalgaon: सिलिंडर बुकिंगच्या कटकटीतून जळगावकरांची सुटका: जिल्ह्यात थेट घरात 'पाईप गॅस'

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प; पाण्यासाठी जसा नळ, तसा गॅससाठी नळ व मीटर; आयटीआयच्या तरुणांना मिळणार रोजगाराची संधी

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : सिलिंडर संपण्याची चिंता, महिनाभराचा हिशोब अन् बुकिंगसाठी लागणारा २५ दिवसांचा फेरा... या रोजच्या डोकेदुखीतून आता जळगावकरांची कायमची सुटका होणार आहे. जिल्ह्यात प्रथमच थेट घराघरांत पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस पोहोचवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 'इंडियन ऑइल कॉर्पोरेशन'तर्फे हाती घेण्यात आला आहे. नळाला जसे पाणी येते, अगदी तसेच आता थेट स्वयंपाकघरातील शेगडीला गॅस मिळणार असून, वापरानुसार मीटरवर बिल आकारले जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात जळगाव शहरात हे जाळे विणले जाणार असून त्यानंतर भुसावळ आणि चाळीसगावचा नंबर लागणार आहे. या प्रकल्पाच्या पूर्वतयारीसंदर्भात नुकतीच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या दालनात बैठक पार पडली. यावेळी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे सीनियर मॅनेजर योगेश लोखंडे आणि मॅनेजर मनीष कुमार गौतम यांनी प्रकल्पाचा सविस्तर आराखडा जिल्हा प्रशासनासमोर मांडला.

'जितका वापर, तितकेच बिल' ; मीटर नोंदवणार रिडिंग

नवीन व्यवस्थेनुसार ग्राहकांना आगाऊ बुकिंग करून सिलिंडरची वाट पाहण्याची गरज उरणार नाही. घराबाहेर मीटर बसवले जाईल, ज्यातून महिन्याला झालेल्या प्रत्यक्ष गॅस वापराची नोंद होईल आणि त्यानुसारच बिल भरावे लागेल. गॅस हंडी आणणे, संपल्यावर धावपळ होणे या त्रासातून विशेषतः गृहिणींची मोठी सुटका होणार आहे.

प्रथम मुख्य भाग, नंतर अडचणीच्या गल्ल्या

प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत माहिती देताना कंपनीचे सीनियर मॅनेजर योगेश लोखंडे यांनी स्पष्ट केले की, प्राथमिक टप्प्यात शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि मोठ्या वसाहतींमध्ये मुख्य पाईपलाईन टाकून घरगुती जोडण्या दिल्या जातील. ज्या दाटीवाटीच्या भागात पाईपलाईनसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही, त्या भागांची तांत्रिक पाहणी करून पर्यायी मार्गांचा शोध घेतला जाईल.

स्थानिक आयटीआय विद्यार्थ्यांना रोजगाराची सुवर्णसंधी

सद्यस्थितीत प्रकल्पाच्या प्राथमिक कामासाठी कंपनीकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहे. मात्र, प्रकल्प जळगाव शहरासह भुसावळ, चाळीसगाव आणि इतर तालुक्यांमध्ये विस्तारल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे. यासाठी स्थानिक 'आयटीआय'च्या विद्यार्थ्यांना तांत्रिक प्रशिक्षण देऊन त्यांना 'बीओटी' तत्त्वावर थेट कामाची संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले. यामुळे जिल्ह्यातील तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या तरुणांसाठी रोजगाराचे नवे दालन खुले होणार आहे. असे सीनियर मॅनेजर योगेश लोखंडे यांनी सांगितले. पाईपलाईन प्रकल्पाचे मुख्य सप्लाय हा बादली येथून होणार आहे. शहरांमध्ये याचे कार्यालय असणार आहे जिथून संपूर्ण प्रकल्पावर देखरेख व दुरुस्तीची जबाबदारी असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT