

जळगाव : जिल्हा कारागृहाच्या कंपाउंड वॉलवर चढून फटाके फोडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला. तपासात हा प्रकार कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात बंदिस्त असलेल्या आकाश मुरलीधर सपकाळे याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांनी कारागृह प्रशासनामार्फत फिर्याद नोंदवून दोन संशयितांना अटक केली आहे.
२० ऑगस्ट रोजी काही तरुण जिल्हा कारागृहाच्या कंपाउंड वॉलवर चढले. त्यांनी कारागृहाच्या भिंतीजवळ फटाके फोडले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. कारागृहाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर असल्याने पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे तपास सुरू केला.
तपासादरम्यान फटाके फोडण्यामागील कारण समोर आले. कारागृहात बंदिस्त असलेल्या आकाश मुरलीधर सपकाळे याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. सपकाळे याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. २५४/२०२५ मध्ये खुनाचा गुन्हा दाखल असून, त्याच्यावर यापूर्वी एकूण नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी जिल्हा कारागृहामार्फत जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. २७०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बीएनएस कलम ३२६ अंतर्गत कारवाई केली आहे. या प्रकरणात विक्की गणेश शिंदे ऊर्फ छोटा माया आणि शुभम जाधव यांना अटक करण्यात आली आहे.
कारागृहाच्या संरक्षण भिंतीजवळ फटाके फोडल्याने त्यातून उडणाऱ्या ठिणग्या कारागृहाच्या आवारात जाण्याची शक्यता होती. त्यामुळे कारागृहातील बंदी तसेच कर्मचारी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याबरोबरच कारागृहाच्या मालमत्तेलाही धोका निर्माण होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर कारागृह प्रशासनाने कायदेशीर तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधितांवर कारवाई केली आहे.
फटाके फोडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी केवळ व्हिडिओपुरती कारवाई न करता त्यामागील कारणाचा शोध घेतला. तपासात हा प्रकार कारागृहातील बंदीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केल्याचे समोर आल्याने प्रकरणाला वेगळे गांभीर्य प्राप्त झाले आहे.