जळगाव : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि तेच रसायनयुक्त दूध 'म्हशीचे दूध' म्हणून धुळ्यातील ग्राहकांच्या माथी मारायचे... असा धक्कादायक प्रकार अमळनेर तालुक्यातील जानवे येथे उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि अमळनेर पोलिसांनी रविवारी (दि.30) संयुक्त कारवाई करत या 'सफेद धंद्या'चा पर्दाफाश केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील जानवे ते इंदापिंप्री रस्त्यावरील एका पत्र्याच्या शेडमध्ये गायी-म्हशींच्या गोठ्याच्या आड भेसळयुक्त दूध तयार केले जात असल्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर पथकाने रविवारी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास अचानक छापा टाकला. यावेळी आरोपी महेश दिलीप पाटील (वय २७, रा. जानवे) हा गायीच्या दुधाची फॅट वाढवण्यासाठी त्यात सोयाबीन तेल मिसळताना रंगेहाथ पकडला गेला. १० लिटर भेसळयुक्त दूध तयार करून ते १०० लिटर गायीच्या दुधात मिसळले जायचे आणि हेच धोकादायक दूध म्हशीचे दूध म्हणून धुळे शहरात विक्रीसाठी पाठवले जात असल्याचे तपासात उघड झाले.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची फिर्याद या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आकाश कैलास बोऱ्हाडे (वय ३०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुरन ४५२/२०२६ अन्वये अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ चे कलम २६(१), २७(३), ३१(१), ३१(२), ५९ सह नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २७४, २७५, १२३ आणि ३१८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात पोलिसांनी कारवाईदरम्यान ४,३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक पोलिसांनी कारवाईची चक्रे वेगाने फिरवत आरोपी महेश पाटील याला रविवारी सायंकाळी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर हे करत आहेत. मानवी जिवाशी खेळणाऱ्या अशा दुग्ध व्यावसायिकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.