Jalgaon Criminals Expelled
जळगाव : जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी कडक प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अन्वये उपविभागीय दंडाधिकारी, जळगाव विभाग यांनी दिलेल्या आदेशानुसार एकाच दिवशी जिल्ह्यातील तब्बल १४ जणांना हद्दपार करण्यात आले आहे.
या कारवाईत नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहा, जामनेरमधील तीन, एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील दोन, तर रामानंदनगर आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकावरही हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
नशिराबाद येथील अताउल्ला उर्फ मायाबाई अमानुल्ला शहा, मुक्तार शहा खलील शहा, अक्रम शहा सादिक शहा, रोहित दिलीप नाथ, विपुल गोविंदा नाथ आणि आवेश उर्फ काल्या शेख जहांगीर यांचा हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे.
जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चेतन उर्फ बटाटा रमेश सुशीर (रा. पिंप्राळा) आणि एमआयडीसी हद्दीतील अरमान चिधा पटेल (रा. रामनगर) यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय जामनेर, फत्तेपूर आणि परिसरातील सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीचे आदेश बजावण्यात आले आहेत. सामरोद येथील प्रकाश सुभाष शिंदे व जगन्नाथ रामकृष्ण कोळी, फत्तेपूर येथील सोपान अशोक इंगळे आणि बेटावद येथील पांडुरंग पाटील यांचाही हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे.
संबंधित व्यक्तींविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्यांच्या सातत्याने सुरू असलेल्या गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरातील शांतता व कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याचे पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावात नमूद केले होते. त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्यांनी हद्दपारीचे प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केले. सुनावणीनंतर संबंधितांना जळगाव जिल्ह्याच्या महसुली हद्दीतून ठरावीक कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले.
जामनेर – ३ | फत्तेपूर – १ | नशिराबाद – ६ | एमआयडीसी – २ | रामानंदनगर – १ | जिल्हापेठ – १ | एकूण – १४
हद्दपारीच्या कालावधीत आदेशाचे उल्लंघन करून संबंधितांनी परवानगीशिवाय जळगाव जिल्ह्यात प्रवेश केल्यास महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गुणवंत देशमुख, चंद्रकांत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल भरत बाविस्कर आणि पंकज सोनवणे यांनी केली.