Jalgaon bypass news: बायपास पुलामुळे जळगावकरांचा जीव धोक्यात; गुन्हा दाखल, मात्र तपास कासवगतीने

आठ दिवसांत एनएचएआयकडे अर्ज करण्यापलीकडे ठोस कारवाई नाही; दुरुस्तीचे कामही संथगतीने
Jalgaon bypass
Jalgaon bypassFile Photo
Published on
Updated on

Jalgaon bypass news

जळगाव : जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाढते अपघात आणि त्यामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी बायपास रस्ता तयार करण्यात आला. मात्र, वर्षभराचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच बायपासवरील आरओबीमध्ये गंभीर तांत्रिक बिघाड होऊन तो वाहतुकीसाठी बंद करण्याची वेळ आली. परिणामी, वाहतूक पुन्हा शहरातून वळविण्यात आली असून अवघ्या महिनाभरात सहा निष्पाप जळगावकरांना जीव गमवावा लागल्याचा गंभीर आरोप होत आहे.

या पार्श्वभूमीवर ‘ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र सिंघल, महाव्यवस्थापक गौतमकुमार दत्ता तसेच संबंधित साइट अधिकाऱ्यांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात १ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊन आठ दिवस उलटले तरी पोलिस तपासाची गती संशय निर्माण करणारी असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचएआय) अर्ज करून संबंधित कामाबाबत माहिती मागविण्यापलीकडे ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप होत आहे. माहिती कधी मिळणार, पुढील कारवाई कधी होणार आणि दोषींची जबाबदारी कधी निश्चित होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Jalgaon bypass
Noise Pollution Jalgaon | कर्कश डीजेचा दणदणाट भोवला; चोपड्यात ‘मोहिनी डीजे बँड’ मालकाविरोधात गुन्हा

‘पोलिस ठाण्यात या’ अन् पुन्हा ‘नंतर बोलू’

याबाबत तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पोलिस ठाण्यात येऊन माहिती घेण्यास सांगितले. त्यानुसार पोलिस ठाण्यात गेल्यावर ‘आपण बैठकीला जात आहोत,’ असे सांगत त्यांनी नंतर बोलण्यास सांगितले. त्यामुळे या प्रकरणातील तपासाबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

कंपनीकडूनही ‘नो रिप्लाय’

दरम्यान, संबंधित कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, ‘याबाबत आम्ही काही सांगू शकत नाही. व्यवस्थापनाशी बोला,’ असे सांगण्यात आले. कंपनीचे महाव्यवस्थापक गौतमकुमार दत्ता यांच्याशी संपर्क साधला असता, ‘मी बाहेर असून सुट्टीवर आहे,’ एवढे सांगून त्यांनी फोन ठेवला. त्यामुळे कंपनीची अधिकृत भूमिका स्पष्ट होऊ शकली नाही.

१५ ऑगस्टची मुदतही हुकली

बायपासवरील आरओबीच्या दुरुस्तीचे कामही अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. संबंधित पूल १५ ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. पुलाच्या एका बाजूने वाहतूक सुरू असतानाच नुकताच एका मोठ्या ट्रेलरचा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.

‘पुढचा बळी गेल्यास जबाबदार कोण?’

बायपासवरील आरओबी बंद असल्याने शहरातील वाहतुकीचा ताण पुन्हा वाढला आहे. या वाढलेल्या वाहतुकीमुळे गेल्या महिनाभरात सहा जळगावकरांचा बळी गेल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता आणखी एखादा निष्पाप नागरिक बळी गेल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

एकीकडे संबंधित कंपनीविरोधात गुन्हा दाखल झालेला असताना, दुसरीकडे तपासाची गती संथ का आहे, कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर पुढील कारवाई कधी होणार, एनएचएआयकडून माहिती कधी मिळणार आणि आरओबीचे काम पूर्ण करून वाहतूक सुरळीत कधी होणार, या प्रश्नांच्या उत्तरांकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.

Jalgaon bypass
Jalgaon Excise Raid | हातभट्ट्यांवर धडक कारवाई: पाच महिन्यांत ९७६ गुन्हे; सव्वादोन कोटींचा मुद्देमाल जप्त, ७९४ जणांना अटक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news