JMC Election News
जळगाव: जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा आता पूर्णपणे ‘वॉर मोड’वर आली आहे. शहरात एकूण ५१६ मतदान केंद्रांवर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. बुधवारी (दि. १४) सकाळी ८ वाजेपासूनच एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनमधून ईव्हीएम आणि साहित्याचे वाटप सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडावी, यासाठी ५२ क्षेत्रीय समन्वयक (झोनल ऑफिसर) आणि ७२ मास्टर ट्रेनर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त राहावा, यासाठी ५१६ पोलीस कर्मचाऱ्यांची ‘खाकी’ तैनात असणार आहे. याशिवाय केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि शिपाई अशा कर्मचाऱ्यांची फौज मतदानासाठी सज्ज झाली आहे.
यंदाच्या निवडणुकीत प्रशासनाने मतदारांसाठी विशेष सोयी केल्या आहेत.
पिंक केंद्रे: महिला मतदारांसाठी खास २ ‘पिंक’ मतदान केंद्रे.
दिव्यांग केंद्र: दिव्यांगांसाठी १ स्वतंत्र मतदान केंद्र.
आदर्श केंद्रे: शहराच्या सौंदर्यात भर घालणारी १२ ‘आदर्श मतदान केंद्रे’ उभारण्यात येत आहेत.
कर्मचारी आणि मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी प्रशासनाने तब्बल १३५ वाहने अधिग्रहित केली आहेत. यात एसटी महामंडळाच्या बसेस, मिनी बसेससह १६ क्रुझर, ५२ टेम्पो ट्रॅव्हलर आणि २० बोलेरो गाड्यांचा समावेश आहे. हा वाहनांचा ताफा प्रशासनाच्या दिमतीला हजर झाला आहे.
मतदानासाठी आवश्यक असलेली मतदान यंत्रे (EVM) आणि कंट्रोल युनिटचे वाटप आज सकाळी ८ वाजता सुरू झाले. एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोडाऊन क्रमांक १४ आणि १६ मधून हे साहित्य कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले जाईल. त्यामुळे उद्या सकाळपासूनच एमआयडीसीत निवडणूक कर्मचाऱ्यांची लगबग पाहायला मिळणार आहे.