Jalgaon Municipal Corporation Election
जळगाव: येत्या पाच वर्षांत जळगाव शहराला विकसित शहरांच्या श्रेणीत आणण्याचा राज्य सरकारचा ठाम संकल्प असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित महायुतीच्या भव्य रोड शो आणि प्रचार सभेत ते बोलत होते.
“जळगावचे सिंगापूर करू, अशा वल्गना करणार नाही. जळगावची संस्कृती वेगळी आहे. मात्र, शहराला विकसित शहरांच्या पंक्तीत नेण्यासाठी ठोस आणि वास्तववादी पावले उचलली जातील,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी जळगावसाठी मंजूर करण्यात आलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. शहरासाठी २५३ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. मलनिस्सारण व्यवस्थेसाठी २९३ कोटी व ३८३ कोटी रुपयांचे दोन प्रकल्प मंजूर असून, या क्षेत्रात एकूण ८८४ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय, घनकचरा व्यवस्थापनासाठी १६.७८ कोटी, अमृत योजनेंतर्गत ७८ कोटी तसेच उद्यानांच्या विकासासाठी ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जळगावला औद्योगिक विकासाच्या दृष्टीने ‘स्पेशल दर्जा’ देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या निर्णयामुळे उद्योजकांना विशेष सवलती मिळणार असून, जिल्ह्यात मोठ्या उद्योगांच्या स्थापनेस चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विधानाबाबत स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्व. विलासराव देशमुख यांच्याबद्दल सर्वच पक्षांमध्ये आदर आहे. महाराष्ट्राच्या विकासात योगदान देणाऱ्या नेत्यांचा सन्मान केला जातो.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत बोलताना त्यांनी, “सावरकरांचा विरोध आम्हाला कधीही मान्य नाही. ही आमची ठाम भूमिका आहे,” असे स्पष्ट केले.
राज्यातील बहुतांश नगरपालिकांमध्ये महायुतीला जनतेचा कौल मिळाल्याचा उल्लेख करत, जळगावमध्येही जनता महायुतीवर विश्वास दाखवेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. येत्या काळात २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल आणि जळगावचा महापौरही महायुतीचाच असेल, असा दावा त्यांनी यावेळी केला.