Jamner Moygaon Burglary Case
जळगाव : जामनेर तालुक्यातील मोयगाव येथे शेतकऱ्याच्या घरात घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३ लाख ३७ हजार ६४४ रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या आरोपीला पाहूर पोलिसांनी काही तासांत अटक केली आहे. विशेष म्हणजे, आरोपी हा गावातीलच रहिवासी असल्याचे निष्पन्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मोयगाव येथील शेतकरी रवींद्र पांडुरंग पाटील (वय ४२) हे ९ मे रोजी रात्री घरी झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील पेटी फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेण्यात आली. ही घटना १० मे रोजी सकाळी उघडकीस आली.
चोरीमध्ये सुमारे २०.४३० ग्रॅम वजनाची सोन्याची शॉर्ट पोत, २.४४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे इअरिंग, ०.८८० ग्रॅम वजनाची सोन्याची नथ तसेच १ लाख ४१ हजार ५६० रुपयांची रोख रक्कम असा एकूण ३ लाख ३७ हजार ६४४ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता.
घटनेची माहिती मिळताच पाहूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक सुस्ते यांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयित सोपान मुरलीधर कवळे (वय ३५, रा. मोयगाव) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाहूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०१२२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(३) व ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुस्ते करीत आहेत.