

Jamner Theft Case
जळगाव : जामनेर तालुक्यात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, घरमालक घराला कुलूप लावून बाहेर गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी भरवस्तीत घरफोडी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. जामनेर येथील एस. टी. कॉलनी परिसरातील एका केबल ऑपरेटरच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण ५० हजार ५०० रुपयांचा माल लंपास केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलेश अशोक पालवे (वय ४०, रा. एस. टी. कॉलनी, वाकी रोड, जामनेर) हे आपल्या कुटुंबासह राहतात. शनिवारी (दि. ९) दुपारी ४ च्या सुमारास पालवे कुटुंब घराला व्यवस्थित कुलूप लावून दुचाकीने जळगाव येथे आपल्या सासुरवाडीला गेले होते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडले आणि घरात प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातील कपाटाचे कुलूप तोडून आत ठेवलेले ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे हार व मंगलसूत्र, ३ ग्रॅमचे छोटे हार-मंगलसूत्र आणि ५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बाल्या (कानातील दागिने) असा एकूण ४८ हजार रुपये किमतीचा सुवर्णालंकार आणि २ हजार ५०० रुपयांची रोकड (१०० व २०० च्या नोटा) असा एकूण ५० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. पालवे कुटुंब रविवारी सकाळी ९:१५ वाजेच्या सुमारास घरी परतले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा आणि कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले.
याप्रकरणी निलेश पालवे यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक इमरान सय्यद हे करीत आहेत.